मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भेटीनंतर मतदारसंघात विधान परिषदेची चर्चा!
(माजी आमदार शहाजीबापू चार दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुसऱ्यांदा भेटले)
‘काय झाडी…काय डोंगार..काय हाटील’ फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या चार दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.
शहाजीबापूंनी प्रथम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. शिरसाटांच्या भेटीनंतर शहाजीबापू पाटील यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी ठाण्यातील घरी बोलावले होते. वाढत्या भेटीगाठीमुळे शहाजीबापू यांच्या राजकीय पुनर्वसनाला वेग आला आहे की राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगोला मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला असला तरी विकास निधीचा ओघ पूर्वीप्रमाणे कायम राहावा. मागील काळात सुरू झालेल्या विकास कामांना निधीची टंचाई भासू नये, यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे, असे शहाजीबापू पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही मार्गी लागण्याची शक्यता या गाठीभेटीमुळे बळावली आहे.
सांगोला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे करूनही विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा शहाजीबापू पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंच्याही जिव्हारी लागला होता. कारण, शहाजीबापू निवडून येतील, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांना होता. मात्र, शहाजी पाटलांचा सांगोल्यात पराभव करून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडून आले आहेत.
शहाजीबापू पाटील हे शिंदेंच्या ‘गुडबुक’मधील आमदार होते. शहाजी पाटील यांना प्रचारासाठी सांगोल्याच्या बाहेरही पाठविण्यात आले होते. त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे शिंदे यांची शहाजी पाटलांवर विशेष मर्जी आहे. विधानसभेला शिवसेनेच्या इतर उमेदवारांंच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतल्या होत्या. सांगोल्यातील पराभवानंतर शहाजीबापूंचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी चर्चा त्यावेळी होती. आता वाढत्या गाठीभेटीमुळे शहाजीबापूंना कुठे आणि कोणती संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहाजीबापू पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, अशीही चर्चा आहे. मात्र, त्याबाबत अजूनही कोणीही ठोस वक्तव्य केलेले नाही. पण, शहाजी पाटील हे विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. आता शिंदे हे शहाजीबापू पाटील यांचं कसं समाधान करणार, हे पाहावे लागणार आहे.
मागील चार दिवसांत शहाजीबापू पाटील हे उपमुख्यमंत्री शिंदे यांना दुसऱ्यांदा भेटले आहेत, त्यामुळे राज्यात पुन्हा काही राजकीय घडामोडी घडणार की शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाला गती मिळणार, हेही पाहावे लागणार आहे.