
कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी घेताना किरण घोडके अटकेत
(आ.अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याची करीत होता बदनामी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याते आमदार अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याने 10 लाखाची खंडणी घेतली आहे. खंडणी घेतानाच पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्या सामाजिक कार्यकर्त्याला पकडले आहे. अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबविण्यासाठी या कामगार नेत्याने एक कोटी रुपयाची मागणी केली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काल पंढरपूर शहरातील कॉलेज चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये 10 लाख रुपयाची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. सध्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या कामगार नेत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सुत्रे आहेत. अभिजीत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याच्या 3 गोडाऊनला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सिल केले होते. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवले होते. यामध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केला होता. काही दिवासापूर्वी सेवानिवृत्त कामगारांनीही केलं होतं आंदोलन
गेल्या काही दिवसापूर्वी माढा तालुक्याचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याविरोधात कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार आणि व्यापारी आक्रमक झाले होते. पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अभिजीत पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने ३४७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणी देण्याकरता ३४७.६७ कोटी कर्ज मिळालेले आहे. त्या कर्ज रकमेपैकी व्यापारी पेमेंट रक्कम रुपये ५९.७५ कोटी रुपये तर कामगार पेमेंट रक्कम रुपये 41.87 कोटी मिळाले आहेत. परंतू ती रक्कम सदर व्यापारी व कामगार यांना अद्याप दिलेली नाही अशी माहिती व्यापारी संतोष भालेराव यांनी दिली होती. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या थकहमी कर्ज रकमेचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती.