विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून शहाजीबापूंना आमदार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे – विजय चौगुले
पदाधिकारी बैठकीत शहाजीबापूंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार
सांगोल्यात रेकॉर्ड होईल इतकी शिवसेनेची ताकद निर्माण झाली आहे. कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेतले. शहाजीबापूंना ५० हजारांचे लीड द्या, शंभर टक्के शहाजीबापू मंत्री होतील. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बूथवर जावून काम करावे लागेल. शहाजीबापूंनी तालुका सुजलाम सुफलाम केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ८० आमदार निवडून येतील. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून शहाजीबापूंना आमदार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक हीच शहाजीबापूंची खरी ताकद आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये घेण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले बोलत होते.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, माझ्या घरात कुणीतरी आमदार होतं, म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मला आवडत नाही. या तालुक्याचा विकास करण्याची मनात जिद्द असावी लागते. पराभवाचा विचार न करता मी माणसं जागं करीत गेलो. सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाल्याने शेती समृध्द होत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आयुष्यभर चळवळ सुरू केली होती. तहसीलदार कार्यालयासमोर मायबाप जनतेला ज्या ज्या योजनेचं पाणी आणण्याचा दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होत असल्याचं समाधान आहे. एकाच आठवड्यात तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटात सात एमआयडीसी करणार असल्याचा विश्वास दिला. वर्षभरात तालुक्यातील सर्वच शेती ओलिताखाली येणार आहे. माझं वय मोजायच्या भानगडीत पडू नका. आणखी २५ वर्षे राजकारणात सक्रिय राहणार आहे. तालुक्याचा प्रत्येक प्रश्न जिव्हाळ्याने सोडवत असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब वाघमोडे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, दिग्विजय पाटील, धनंजय काळे, दादासाहेब लवटे, सागर पाटील, दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, प्रीतीश दिघे, प्रा.संजय देशमुख, समीर पाटील, आनंदा माने, विजय शिंदे, शिवाजी घेरडे, मुबीना मुलाणी, राणी माने, छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे, अस्मिर तांबोळी, ज्ञानेश्वर तेली, अभिजीत नलवडे, सुभाष इगोले, दादासाहेब वाघमोडे, अजिंक्य शिंदे, सोमेश यावलकर, शिवाजीराव बाबर, जगदीश पाटील, धनजंय बागल, सत्यवान मोरे, अशोक शिंदे, विजय इंगोले, सुधाकर कवडे, तानाजी पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुधाकर कवडे, विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, सुभाष इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले. या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.