श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकामाचा शासन निर्णय निर्गमित,13 कोटीचा निधी वितरीत,
तिरूपतीच्या धर्तीवर टोकण दर्शन व्यवस्थेकामी नामांकित टिसीएस कंपनीला प्रस्ताव,मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आषाढी एकादशी च्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी दर्शन रांगेत पत्राशेड येथे आले होते. त्यावेळी त्यांना दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत मंदिर समितीचा सह अध्यक्ष या नात्याने मंदिर समितीच्या वतीने विनंती केली होती.
त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी, प्रस्ताव तयार करून शासनास तात्काळ सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले होते. जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन, शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन रूपये 129.49 कोटीचा आराखडा राज्य शिखर समिती समोर सादर केला होता. या आराखड्यास शिखर समितीने मंजुरी देऊन दि.11 ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून 13 कोटीचा निधी वितरीत केल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणेकामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन 2018 मध्ये मंदिर समितीच्या सभेत ठराव पारीत केला होता. या दर्शन हॉल व स्कायवॉकचे संपूर्ण व्यवस्थापन, टोकन दर्शन व्यवस्था, देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता व इतर अनुषंगिक सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे. सदर आराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे.
दर्शनमंडप 16185 चौ.मी इतक्या जागेत असून, वॉटर हार्वेस्टींग, सीसीटीव्ही, सुरक्षा, सार्वजनिक सुचना प्रणाली, ऑर्गनिक वेस्ट कर्न्वेटर, सेव्हेज मॅनेजमेंट सिस्टीम इत्यादी सोईयुक्त 2 मजली आहे. त्यासाठी सुमारे 87.31 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच स्कायवॉक हा श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ते पत्राशेड पर्यंत 1050 मीटर लांबीचा असून, 2 मीटर रूंदी व जमिनीपासून 4 मीटर उंच व इतर मुलभूत सोई सुविधांयुक्त असून, 42.18 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येणार असून, सदर काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाच्या देखभालीची तसेच इतर अनुषंगीक कामांची जबाबदारी व कार्यान्वयीन यंत्रणा ही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शन रांगेसाठी टोकन प्रणाली प्रस्तावित आहे. जेणेकरून भाविकांना सहज आणि लवकर दर्शन घेता येईल. या संदर्भात अनेक मोठ्या मंदिराशी संपर्क साधला असता, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर ही कंपनी सेवाभावी तत्त्वावर त्या ठिकाणी टोकन प्रणाली मोफत उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदर कंपनीशी लेखी पत्रव्यवहार करून संपर्क साधण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार यासाठी पायाभूत सुविधा उभारणार असून टोकन प्रणाली मंदिर समिती चालवणार आहे. या कंपनीने सेवाभावी तत्त्वावर तिरुपती, शिर्डी आणि अयोध्या मंदिरांमध्ये मोफत टोकन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांना मंदिर समितीसाठी टोकन दर्शन व्यवस्थेकामी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.