पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांबाबत आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याशी गणेश अंकुशराव यांची चर्चा
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध असुविधांबाबत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील पोष्टमार्टेम विभागाची दुरावस्था, रुग्णालय व परिसरातील अस्वच्छता, रुग्णालयाच्या विविध विभागात नेमलेले ठेकेदार यांचे निकृष्ट काम, बंद अवस्थेतील रुग्णालयाच्या विविध विभागातील मशिनरी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, ब्रदर्स, सिस्टर आदी रिक्त जागा भरणे, उपजिल्हा रुग्णालयात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे आदी प्रश्नांसोबतच उपजिल्हा रुग्णालयाला आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नांव देण्याची मागणी आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
नुकतेच आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 200 बेडच्या विभागाचे भुमीपुजन संपन्न झाले. यावेळी गणेश अंकुशराव व त्यांच्या सहकार्यांनी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील विविध प्रश्न, चंद्रभागेतील अवैध वाळु उपशाचा प्रश्न, पंढरपूरचे तहसिलदार व प्रांताधिकारी यांचे अवैध वाळु उपशाकडे जाणीवपुर्वक होत असलेले दुर्लक्ष, अवैध वाळु उपशामुळे चंद्रभागेत पडलेल्या खड्ड्यात बुडून आदिवासी महादेव कोळी जमातीच्या तरुणाचा झालेला मृत्यु आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
पंढरपूरचे तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्यावरील तक्रारीची यावेळी आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करुन तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई करु असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व प्रश्न सोडवू तसेच आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील स्मारकाबाबत व उपजिल्हा रुग्णालयाच्या नामकरणाबाबतही सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासनही आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी गणेश अंकुशराव यांना दिले. यावेळी गणेश अंकुशराव यांनी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या तडफदार कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक कार्यकर्ते व आदिवासी महादेव कोळी जमातीचे अनेक समाजबांधव व महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चौकट
आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर ‘त्या’ तरुणावर केले अंत्यसंस्कार
ज्या दिवशी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांची गणेश अंकुशराव यांनी भेट घेतली त्याचदिवशी सकाळी चंद्रभागेत अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बुडून पंढरपूरातील आदिवासी महादेव कोळी जामतीतील तरुण सचिन महेश अभंगराव याचा मृत्यु झाला होता. त्यामुळे संतप्त समाजाने जोपर्यंत बेजबाबदार प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सदर तरुणाचे प्रेत ताब्यात घेणार नाही. अशी भुमिका घेत ठिय्या आंदोलन केले होते. परंतु आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी तहसिलदार व प्रांताधिकारी यांंच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर तरुणाचे प्रेत ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात आला.