श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे मारहाणीच्या गैरप्रकारानंतर कडकडीत बंद; पुजारी व व्यापाऱ्यांचा घटनेच्या तीव्र निषेध व्यक्त!
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे रविवारी घडलेल्या परिते येथील भाविक व मंदिर पुजारी यांच्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकाराच्या निषेधार्थ आज, सोमवार (दि. 23 मार्च) सकाळपासून डोंगर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.या बंदला पुजारी वर्गासह स्थानिक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिते गावातील सुमारे 100 ते 200 जणांचा समूह दर्शनासाठी जोतिबा डोंगरावर आला होता.मात्र, त्यापैकी काही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे.संबंधित भाविकांनी मंदिर परिसरात प्रवेश करून आरतीदरम्यान गोंधळ घालत धक्काबुक्की केल्याचे सांगितले जाते. यावेळी काहींनी वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन केले तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.विशेष म्हणजे, आरतीच्या वेळी ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्यांचे धोतर फेडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच देवस्थान इनचार्ज यांच्यावरही हात उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेदरम्यान मंदिर प्रशासन व संबंधित भाविकांमध्ये वाद झाला होता.मात्र,या वादाचा संपूर्ण तपशील काही माध्यमांतून समोर न आल्याने चुकीचा संदेश पसरत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणी संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मंदिर परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त होत असून, संपूर्ण सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
