शिवसेनेने आयोजित केलेल्या महिलांच्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम
गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत २४ भजनी मंडळे सहभागी झाली होती. सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात आली असल्याची माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ९ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने सांगोल्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या भजन स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जवळपास ५०० महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेत २४ भजनी मंडळानी सहभाग घेतला. या स्पर्धेत माऊली महिला संगीत भजनी मंडळ सांगोला यांना प्रथम क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस, श्री दत्त महिला भजनी मंडळ सांगोला यांना द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस, श्रीराम महिला भजनी मंडळ सांगोला यांना तृतीय क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास १५०० रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस तसेच
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास २५०० रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात असल्याची माहिती शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली.