जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पंढरपूर येथील कृषी सेवा केंद्रांना भेटी
कृषी सेवा केंद्रातील बी बियाण्याच्या नोंदी, खरेदी विक्री नोंदी, विक्री परवाने, मुदत बाह्य निविष्ठा तपासणी आदी बाबींची सखोल चौकशी केली
कृषी विभागाने शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
शेतकऱ्यांनी निविष्ठाच्या अनुषंगाने 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन
यावर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केलेली असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून बी-बियाणे, खते याविषयी कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी पंढरपूर येथील काही कृषी सेवा केंद्रांना अचानकपणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या कृषी सेवा केंद्रातील विविध प्रकारचे विक्री परवाने, बी बियाण्यांच्या नोंदी, खरेदी विक्री पावत्या, मुदत बाह्य निविष्ठा आहेत का? याची प्रत्यक्ष पाहणी केली. कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांची कोणत्याही पद्धतीने जर फसवणूक केली तर त्यांच्यावर विहित शासकीय नियमावली प्रमाणे अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत मोरे, कृषी अधिकारी पंचायत समिती विकास काळुंखे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपूर मधील मे. प्रेरणा बीज भंडार व मे फुलचंद रामचंद गांधी या कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विक्री परवाने, बियाणे व खत यांची खरेदी बिले, साठा पुस्तक, दर फलक, भाव फलक, टोल फ्री क्रमांक, मुदतबाह्या निविष्ठा, तसेच बियाणे व खत यांचे बॅग अथवा पिशवीवर कोणती माहिती छापलेली असते इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विक्रेत्यांनी खरेदी बिलाप्रमाणे साठा पुस्तकामध्ये बियाणे व खत यांची विक्रेत्यांनी आवक घेतली आहे का याची स्वत: खात्री केली व त्याच्या नोंदी तपासल्या. खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तक्रारी असल्यास त्यांनी कोठे तक्रार करावी याबाबत ही माहिती जाणून घेतली. विक्री केंद्राच्या दर्शनी भागत लावण्यात आलेला महाराष्ट्र शासन, कृषी विभाग टोल फ्री क्रमांक 18002334000 हा चालू आहे का याची कॉल करून खात्री करून घेतली. त्यानंतर मुदत बाह्य निविष्ठा बाबत काय कार्यवाही केली जाते हे ही जाणून घेतले. मुदत बाह्य निविष्ठा शेतकऱ्यांना विक्री होणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता कृषी विभागाने काटेकोरपणे घ्यावी असेही त्यांनी निर्देशित केले.
बियाणे, खत व किटकनाशक या निविष्ठा बाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत का? तसेच काही अडचणी आहेत का? हे ही जाणून घेतले. तसेच कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी या दोन्हीही कृषी सेवा केंद्राची नियमाप्रमाणे सखोल चौकशी करावी व जिल्ह्यात कोठेही कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना टंचाई भासणार नाही याचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.