उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करून पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे भरून द्यावेत:- आ.शहाजीबापू पाटील
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे उजनीत ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा, उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे, साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने भरत आहे. धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. येत्या दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रदेशात आहेत तसेच आणि गावांमधील पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत.
त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा, उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून बंधारे, साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील
पळशी, सूपली उपरी, भंडीशेगाव, वाडीकुरोली, शेळवे, केसकरवाडी बंधारे भरून द्यावेत. तसेच अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, साठवण तलाव, बंधारे या पाण्याने भरून द्यावेत. भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
लाभक्षेत्रातील कोल्हापूर पध्दतीच्या बहुतांशी बंधार्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बर्यापैकी असली तरी काही दिवसाताच पाणी पातळी खालावून पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील बंधार्यात पाणी सोडून ते भरल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही व शेतीचा प्रश्नही सुटेल. नदीकाठावरील बागायती पट्टाही पाण्याअभावी होरपळला असून पाण्याअभावी ऊस पिकांचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. पाण्याअभावी उभी पिके जळून गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्याअगोदरच उजनी धरणाच्या मुख्य कालवा, उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडून बंधारे, साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्यावेत अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.