अभिजीत पाटलांनी लोकशाही मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन केला विधानसभेत प्रवेश!
(आ.अभिजित आबा पाटील यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण पाटील कुटुंबीय उपस्थित)
माढा मतदारसंघातून बलाढ्य शिंदे कुटुंबास पराभूत करत विजयी झालेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांची विधानसभेतील एन्ट्री विशेष ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कित्ता गिरवत लोकशाहीचे राज्यातील सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानसभेच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या या कृतीची विशेष चर्चा होताना दिसत आहे.
पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवली. पाटील यांनी माढ्यातून तब्बल सहा वेळा निवडणूक जिंकलेले बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्याशी दोन हात केले. या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी १ लाख ३६ हजार ५५९मते पडली, तर त्यांचे विरोधक रणजित शिंदे यांना ०१लाख ०५ हजार ९३८ मते मिळाली. पाटील यांनी शिंदे यांचा ३० हजार ६२१ मतांनी विजय झाला.
अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून आपल्या राजकीय इनिंग सुरुवात झाली आहे. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेत्यांना मात देत 07 जुलै 2022 रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली. त्यानंतर पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी पंढरपुरातून अभिजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे भालकेंनी वेगळा निर्णय घेत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही अभिजीत पाटलांनी थोरल्या पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. कारखाना वाचविण्यासाठी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पण, पक्ष कोणता असेल याचा निर्णय त्यांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवला. शरद पवारांनीही बबनराव शिंदे यांच्यासारख्या मातब्बर आमदाराला डावलून नवख्या अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली.
शरद पवारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत अभिजीत पाटील यांनी माढ्यातील शिंदेशाही बरखास्त करत विधानसभेत एन्ट्री केली. लोकशाहीचे राज्यातील सर्वोच्च मंदिर असलेल्या विधानसभेत एन्ट्री करण्यापूर्वी अभिजीत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कित्ता गिरवला. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी लोकसभेच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सभागृहात प्रवेश केला होता. त्याच पद्धतीने पाटील यांनीही विधानसभेच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊनच सभागृहात प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. पण महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून आज शपथ घेतली नाही. ते उद्या आमदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे.