
मराठा आरक्षणावरती लवकरच विशेष अधिवेशन बोलावण्याची आ.समाधान आवताडे यांची मागणी!
(सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या पहिल्या आमदारांनी मागणी केल्यामुळे सर्व मराठा समाजामध्ये समाधानाचे वातावरण)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सकल मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकवटला असल्यामुळे मुंबईमध्ये मराठ्यांचे भगवे वादळ आल्याचे पहावयास मिळत आहे.या ऐतिहासिक आंदोलनास विरोधी पक्षच नव्हे तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षातील आमदारांकडूनही पाठिंबा दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील सर्वात लक्षवेधी मराठा आरक्षण आंदोलनास सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येत असून आमदार-खासदारही सहभागी होऊन आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच, सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.
सकल मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आ.आवताडे यांनी केली असून राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर थेट भूमिका त्यांनी घेतली. राज्यात महायुतीचे सरकार असून आ.आवताडे हे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचे ते आमदार आहेत.
आ.समाधान आवताडे यांनी दिलेल्या पत्रानुसार, उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानासह मुंबई शहरामध्ये आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकवटला आहे. मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या मागणीप्रमाणे गरजवंत सकल मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सकल मराठा समाजाची तीव्र मागणी आहे. तरी मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे ही नम्र विनंती, असे आ. समाधान महादेव आवताडे यांनी म्हटले आहे.
राज्य विधीमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे ही नम्र विनंती, असे आ. समाधान महादेव आवताडे यांनी म्हटले आहे.
आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची भेट
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव मुंबईत दाखल होत असून, सीएसटी रेल्वेस्थानक आणि आझाद मैदान परिसरात मराठ्यांचा जनसागर उसळला . रेल्वे आणि खासगी वाहनांनी मराठा बांधव मुंबईत आले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार 5000 आंदोलकांची मर्यादा होती, पण आंदोलकांची मोठी संख्या मैदानात होती. तर, मैदानाबाहेरही तेथील परिसरात मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. आज दिवसभरात बीडमधील खासदार, आमदार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, माढा विधानसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे आ. अभिजीत पाटील यांनीही आंदोनलस्थळी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे.
*आ. समाधान आवताडे यांच्या या मागणीमुळे आता सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदारही आरक्षणाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवत असल्याचे सुखद चित्र पहावयास मिळत आहे*.
