विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त:व्यवस्थापक मनोज श्रोत्री
बेंगलोर येथील सविता चौधरी व इतर दोन भाविकांकडून पोषाख प्राप्त
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून, दिनांक 02 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त झाला आहे. हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येणार असून,त्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री रूक्मिणी स्वयंवर कथा दि. 30 जानेवारी ते 01 फेब्रुवारी या दरम्यान दुपारी 4.00 ते 6.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी स.10.00 ते 12.00 या वेळेत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. कथेचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् भागवताचार्य कु. साध्वी अनुराधा (दिदी) राजेंद्र शेटे यांचे सुमधूर व रसाळ वाणीने सुरू आहे.
वसंत पंचमी दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखुटा ऐवजी मंदिल पांढरे पागोटे घालण्यात येते. (या दिवसापासुन श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमी पर्यत सुरू होतो.) पहाटे नित्यपुजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो तसेच श्री रूक्मिणी मातेकडे काकडा आरती व नित्यपुजेच्या वेळेस वसंत पंचमी निमित्त फक्त याच दिवशी सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो (इतर वेळी श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख परीधान करीत नाहीत) नित्यपुजेच्या वेळेस रूक्मिणी मातेस गुलाल टाकण्यात येतो.
सकाळी 11.00 वा. श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येते. त्यावेळेस श्रीस पांढरा पोशाख करण्यात येतो. तसेच श्री विठ्ठलास गुलाल टाकुन श्रीस विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण दिले जाते. तसेच श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख व अलंकार परीधान केले जातात. त्यानंतर श्री रूक्मिणी मातेची पाद्यपुजा करून नैवेद्य, आरती करण्यात येते. श्री रूक्मिणी मातेस गुलाल टाकला जातो व रूक्मिणी मातेस विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण दिले जाते. दु.12.00 वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची प्रतिकात्मक मुर्ती श्री विठ्ठल सभामंडपामध्ये आणुन विधीवत मंत्र उच्चारासहीत विवाह सोहळा संपन्न होतो.
तद्नंतर दुपारी 4.00 वाजता पोशाखानंतर श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची पाद्यपुजा करण्यात येते. त्यानंतर श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मुर्तीची प्रदक्षिणा मार्गाने सवाद्य शोभा यात्रा काढण्यात येते. व्ही.आय.पी. गेट – श्री संत नामदेव पायरी महाव्दार पोलीस चौकी – कालिका देवी मंदिर – काळा मारूती चौफाळा नाथ चौक तांबडा मारूती मंदिर माहेश्वरी धर्मशाळा – महाव्दार पोलीस चौकी श्री संत नामदेव पायरी पश्चिमव्दार व्ही. आय.पी. गेट या मार्गाने शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
श्रींसाठी बेंगलोर येथील सविता चौधरी व इतर दोन भाविकांकडून पोषाख प्राप्त झाले आहेत. सदरचा सोहळा जास्तीत जास्त भाविकांना पाहता यावा यासाठी चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी येथे एलईडी स्क्रिन बसविण्यात येणार आहेत. तसेच त्याच ठिकाणी अक्षता वाटप होणार आहे. त्यादिवशी दुपारी 12 ते सायं. 7 पर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितले.