रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या! शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही मात्र तुटपुंज्या मोबदल्याला नक्कीच विरोध!
-प्रा.संग्रामदादा चव्हाण.
रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या असतात ज्याप्रमाणे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगलं राहतं त्याचप्रमाणे देशातले रस्ते चांगले असतील तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं आरोग्य सुदृढ राहतं.देशाचा विकास हा देशातील रस्त्याच्या जाळ्यावर अवलंबून असतो. या गोष्टीची जाणीव सर्व शेतकऱ्यांना असून शक्तिपीठ हा महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प आहे आणि हे सरकार कमी किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून काहीही झालं तरी महामार्गाची निर्मिती करणारच! शक्तीपीठ महामार्ग ह्या प्रकल्पाला फक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध दिसत असून नागपूर पासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र जमीन संपादनासाठी दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्याला मात्र नक्कीच विरोध आहे.
लोकसभेतील पराभवाचे खापर शक्तिपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावर फोडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केला होता. शेतमालाला हमीभावाचा अभाव, नैसर्गिक संकटं,चुकीची सरकारी धोरणं, खते कीटकनाशकांच्या अवाक्या बाहेर गेलेल्या किमती,डिझेल पेट्रोलच्या वाढत्या किमती,आणि सर्वच क्षेत्रातील महागाई यामुळे देशातील व राज्यातील शेतकरी कर्जबाजारी व कंगाल होऊन त्रस्त झाला असून त्याला शेती सांभाळणं,शेती कसणं तसेच दैनंदिन जगणंही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांवर महामार्गासाठी “आमच्या जमिनी घ्या पण आम्हाला मोबदला चांगला द्या* अशी म्हणायची दुर्दैवी वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून महामार्ग गेला नाही ते शेतकरी असं म्हणत आहेत की “आमच्या शेतातून हा महामार्ग गेला असता तर किती बरं झालं असतं ” शेतकरी किती भीषण अवस्थेमधून पुढे जात आहे याचे हे विदारक चित्र आहे. सरकार या महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना अत्यंत तुटपुंजा मोबदला देणार असून या बाबीसाठी शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध राहील. शेतकऱ्यांची शेती ही त्याची “जन्माची भाकरी “असून ती कायमची हिरावून घेताना मनात माणुसकी ठेवून त्याच्या जमिनीला बाजारभावाच्या दहापट मोबदला देणं गरजेचं आहे. तरच सर्व शेतकरी आपल्या जमिनी या प्रकल्पाला स्वच्छेने देतील. परंतु सरकार फक्त दुप्पटच किंमत देणार असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींना चालू बाजार भावा पेक्षाही कमी किंमत मिळणार असून तो उध्वस्त होईल. वाढीव मोबदला व नुकसान भरपाई मिळण्यासाठी नागपूरपासून सोलापूर पर्यंतचे सर्व शेतकरी एकजुटीने जीवाचं रान करतील.असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भीमा परिवाराचे संघटक प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. याप्रसंगी श्री चव्हाण यांनी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना महामार्गाला विरोध न करण्याचे आवाहन करतानाच वाढीव आणि न्याय्य मोबदला मिळण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.