महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा जयंतराव पाटील
(महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ उपळाई येथे जाहीर सभा)
महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची परिसीमा गाठणाऱ्या त्रिकुटाला पुन्हा सत्तेत बसवणे म्हणजे राज्याला अधोगतिकडे नेण्यासारखे आहे, हे राज्यातील जनतेने ओळखले आहे. सध्या निवडणूक आपल्या टप्प्यात आली असून विजयाचे मताधिक्य वाढवा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी उपळाई (ता.माढा) येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संजय पाटील-घाटणेकर, ॲड. बाळासाहेब पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, निरीक्षक शेखर माने, प्रशांत पाटील, विलास साठे, संदीप साठे, रवी पाटील, नागेश फाटे, साईनाथ अभंगराव, बापूसाहेब जाधव, विलास देशमुख, दीपक देशमुख, ज्योती कुलकर्णी, सुवर्णा शिवपूजे, पोपट अनपट, रणजित बागल, विजयसिंह पाटील, संजय पाटील, रामकाका मस्के, बाबुतात्या सुर्वे, भारत पाटील, आकाश पाटील, रावसाहेब देशमुख, रविंद्र पाटील, विजय भगत, प्रमोदिनी लांडगे, ऋतुजा सुर्वे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयावेळी जयंत पाटील यांनी आकडेवारीसह महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली. या सरकारच्या धोरणामुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाली असून भारताच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा १५ टक्के असणारा वाटा १३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय २०१४ पर्यंत दरडोई उत्पन्नात कायम गुजरातच्या पुढे आणि प्रथम चार क्रमांकात असणारे आपले राज्य आता गुजरातच्या खाली असून त्याची घसरण अकराव्या क्रमांकावर आली आहे. असे श्री.पाटील यांनी सांगितले. अभिजित पाटील यांना शरद पवार साहेबांनी पूर्ण अभ्यास करून उमेदवारी दिली असल्याचे सांगून त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आबांनी पाच साखर कारखाने चालवण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. शिवाय त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून गोरगरिबांची तळमळ आहे आणि तरुण आहेत. म्हणूनच शरद पवार साहेबांच्या विचारांच्या लढाईला साथ देण्यासठी त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या शासनाची पंचसूत्री विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी लक्ष्मण ढोबळे, संजय पाटील-घाटणेकर, ज्योती कुलकर्णी, संदीप साठे यांची सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही राजकारणावर बोट ठेवणारी भाषणे झाली.
निवडणूक एकतर्फी जिंकणार:- अभिजित पाटील
यावेळी उमेदवार अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघाच्या विजयाचे व्हिजन मांडून अभिजीत पाटलाला मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत असे सांगत ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार म्हणजे ऊर्जा तर जयंत पाटील म्हणजे संयम असा उल्लेख त्यांनी केला तेव्हा उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. माढ्याने लोकसभेला नवा खासदार दिला आता नवा आमदार देऊन येथील जनता इतिहास घडविणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.