पंढरपूर कॉलेजचे विद्यार्थी प्रिय प्रा.प्रतापराव पवार यांचे दुःखद निधन
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्रा.प्रतापराव खासेराव पवार यांचे यांचे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आपल्या शेतातील राहत्या घरी हृदय- विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.ते 74 वर्षांचे होते. मूळचे कराड येथील रहिवासी असणारे प्रा.प्रतापराव पवार हे सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून शिवाजी विद्यापीठ येथून पदव्युत्तर शिक्षण घेऊन ते रयत शिक्षण संस्थेमध्येच वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता पदावर सेवेत रुजू झाले होते.त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कराड, दहिवडी,कर्जत व अंतिम टप्प्यात कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर या ठिकाणी सेवाकाळ पूर्ण करून निवृत्ती घेतली होती. ते प्राणीशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध व प्रबंध सादर केले. त्यांच्या उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण शिकवण्याच्या कौशल्यामुळे तसेच सामान्य विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीमुळे ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्या दुःखद निधनाने रयत शिक्षण संस्थेचा प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली,जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.