संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार शहाजीबापू पाटील
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
सकल नाभिक समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सांगोल्यात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देवून नाभिक समाजाच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची राज्याचे समिदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील नाभिक समाजाला दिलासा दिला जाईल असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सकल नाभिक समाजाच्या शिष्ट मंडळाला दिले.