जलसिंचन प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार – आमदार शहाजीबापू पाटील
उद्या शुक्रवारपासून बुद्धेहाळ तलावात टेंभूचे आवर्तन, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत, शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लागल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून टेंभू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी कोळा नाला येथून टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती. गेल्या पाच वर्षात सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी मतदार सर्व योजनांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने सिंचनाच्या योजना मार्गी लागल्या आहेत. सांगोला विधानसभा मतदार संघातील जलसिंचनाची प्रलंबित कामे व सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागली आहेत.
खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याकडे टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून माण नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी टेंभू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुद्धेहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुद्धेहाळ तलावाच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.