अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील – आ.शहाजीबापू पाटील
(स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत एखतपूर, शिवणे गावांचा समावेश, ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ)
वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपगृहाचे बांधकाम, उर्ध्वगामी नलिका बांधकाम, वितरण कुंड, मुख्य गुरूत्वीय नलिका, बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाची सुमारे २९९ कोटी २१ लाख ३३ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्याने सांगोला तालुक्यातील एखतपुर आणि शिवणे गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून १४ गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पांतून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही
शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या शिवणे व एखतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, सरपंच दादासाहेब घाडगे, शंकर जाधव, विजय इंगोले, महादेव शिंदे, प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा या योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेत १२ वंचित गावातील ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला. तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी शिवणे, नरळेवाडी, य.मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या गावांचा समावेश होता. एक ही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत एखतपूर आणि शिवणे गावांचा नव्याने समावेश केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचे पाणी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आवर्जून सांगितले.