वारकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत विकासाची दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प – आ.शहाजीबापू पाटील
शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान करीत सर्व समाज घटकांना अर्थसंकल्पात न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पंढरीच्या वारकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. त्यानंतर बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार शासनाने उचलला असून शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मिळालं आहे. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यामुळे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा अर्थसंकल्प आहे. पंढरीच्या वारकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, युवा वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीद्वारे महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश आहे, असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले