पंढरपुरातील ‘दत्तकृपा पेट्रोलियम’ च्या मॅनेजरवर पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
पंढरपुरातील ‘दत्तकृपा पेट्रोलियम’ च्या मॅनेजरवर पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
भोसे, ता. पंढरपूर येथील दत्तकृपा पेट्रोलियमवर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले तानाजी अर्जुन कोळी रा. पंढरपूर, यांच्यावर १,३२,५९,१५६ रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी करकंब पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादी जबाबामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सौ. सुरेखा बाळासाहेब माळी यांचा शेती व पेट्रोल व डिझेल पंप हे व्यवसाय आहेत. त्यांचे पती बाळासाहेब माळी यांनी सुरेखा माळी यांच्या नावावर मौजे भोसे, ता. पंढरपूर येथे एचपीसीएल या कंपनीकडून पेट्रोल, डिझेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु, सुरेखा माळी यांचे दहावी शिक्षण असून त्यांना व्यवहाराबाबत अनुभव नसल्याने अनुभवी माणसांची गरज होती. त्यावेळी तानाजी अर्जुन कोळी रा. इसबावी, ता. पंढरपूर यांना पेट्रोलपंप चालवण्याचा अनुभव असल्याने मॅनेजर म्हणून काम दिले. दरमहा दहा हजार रुपये पगार देऊन दि. १/११/२०२० पासून त्यांना कामावर ठेवले. सौ. सुरेखा माळी यांचा पुतण्या प्रदीप महादेव माळी हा पेट्रोल पंप पर्यवेक्षणाचे व मॅनेजर तानाजी कोळी यांच्यावर देखरेख करण्याचे काम करत होता. मॅनेजर तानाजी कोळी हे आवश्यकतेनुसार एचपीसीएल कंपनीकडून पेट्रोल डिझेल व ऑइलची मागणी करणे, कंपनीचे अधिकृत रजिस्टर अद्यावत ठेवणे, विक्री व खर्चाच्या दैनंदिन हिशोबवह्या अद्यावत ठेवणे, दररोज विक्री करणाऱ्या मुलांचा हिशोब घेणे, उधारी वसूल करून त्याचा हिशोब ठेवणे, पंपासाठी येणारे महावितरण कंपनीचे विज बिल भरणे, पंपाच्या आडीनडीला रक्कम उपयोगी पडावे म्हणून उघडलेल्या विविध बँकांच्या डेली पिग्मी खात्यात रक्कम भरणे, पंपासा दैनंदिन खर्च करणे, विक्रीतून आलेल्या रकमा बँकेत भरणा करणे, विक्री करणाऱ्या मुलांचे पगार करणे, पंपाशी संबंधित कर्ज हफ्ते नियमित भरणे, प्रत्येक महिन्याला पंपाचे एकूण उत्पन्न व खर्च याचा अहवाल बनवणे तसेच एचपीसीएल कंपनी व बँका यांच्याशी आवश्यकतेनुसार पत्रव्यवहार करणे अशी कामे करत होते. परंतु, पंप चालू झाल्यानंतर काही महिन्यांनी प्रदीप माळी यांनी पेट्रोल व डिझेल पंपाच्या व्यवहारात हिशोब जुळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान 2023 मध्ये पेट्रोल व डिझेल विक्री स्टॉकचा मागणी अभावी तुटवडा पडल्याने काही काळ पंप बंद राहू लागला. तेव्हा मॅनेजर कोळी यांना विचारल्यावर त्यांनी स्टॉकची मागणी करण्यासाठी पैसे नसण्याची माहिती दिली. तसेच लोकांना उधारीवर दिलेले पेट्रोल व डिझेल याची वसुली न झाल्याचे सांगितले. त्यावेळी सौ. सुरेखा माळी यांनी प्रत्यक्षात त्या संबंधित लोकांशी संपर्क साधला. त्यावर कोणतीही थकबाकी नसल्याचे संबंधित लोकांनी सांगितले. त्यानंतर मॅनेजर तानाजी कोळी यांच्यावर सौ. सुरेखा माळी यांना संशय येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यांचे पती बाळासाहेब माळी व भाऊ परमेश्वर ननवरे यांना पंपाचे दफ्तर दाखवले. त्यावेळी त्यांना व्यवहारात बरीच मोठी अफरातफर आल्याची शंका आली. यावर बाळासाहेब माळी व परमेश्वर ननवरे यांनी त्यांच्या ओळखीचे सनदी लेखापाल एस. एस. साठे रा. पुणे यांची नेमणूक करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी दत्तकृपा पेट्रोल पंपाच्या दि. ४/११/२०२० पासून ते ३१/३/२०२३ पर्यंतचे स्पेशल ऑडिट करून किती रकमेची तफावत होते हे पाहण्यास सांगितले. त्यानंतर एस. एस. साठे यांनी प्रत्यक्ष पंपावर भेट देऊन व मॅनेजर तानाजी कोळी यांनी लिहिलेल्या दैनंदिन हिशोबाच्या नोंदवहया तसेच डेली सेल रिपोर्ट, कोळी यांनी दिलेले एकूण मासिक उत्पन्न व एकूण मासिक खर्चाचे अहवाल तसेच बँक व्यवहाराचे खाते उतारे इत्यादी सर्व कागदपत्रे हस्तगत करून हिशोब तपासून ऑडिट केले. तेव्हा मॅनेजर तानाजी कोळी यांनी उधारीने गेलेल्या पेट्रोल व डिझेलचे पैसे संबंधित ग्राहकांनी मॅनेजरकडे जमा करून सुद्धा ते दैनंदिन हिशोब वहीला जमा न दाखवणे, एचपीसीएल कंपनीचे अधिकृत रजिस्टर पेक्षा दैनंदिन हिशोब वहीला पेट्रोल व डिझेलची विक्री कमी दाखवून रोख रकमेचा अपहार करणे, पंपाचे विविध पिग्मी खात्यातील भरलेले रकमेचे खोटे आकडे हिशोब वहीत नोंदवणे, महावितरणचे विज बिल भरण्याचे रकमेचे खोटे आकडे हिशोब वहीत नोंदवणे या दिलेल्या रेकॉर्डच्या आधारे श्री. एस. एस. साठे यांनी दि. २०/९/२०२३ रोजी अहवाल दिला असून त्या अहवालाप्रमाणे मॅनेजर तानाजी कोळी यांनी १ कोटी ४ लाख ७१ हजार ११७ इतक्या रकमेचा अपहार केल्याचे दिसून आले आहे.
तसेच ऑडिट रिपोर्ट शिवाय इतर बाबी तपासल्या असता म्हणजे, ग्राहकांनी खरेदी केलेले पैसे ऑनलाईन घेताना पंप खात्यावर न घेता तत्कालीन कामावर असणारा पेट्रोमनच्या खात्यावर घेण्यास भाग पाडून नंतर ते पेट्रोमन करून स्वतःच्या खात्यावर वळवून घेऊ त्या रकमेचा अपहार करणे, कंपनीकडून मिळणाऱ्या पेट्रोल व डिझेल कमिशन उत्पन्नापेक्षा मासिक अहवालात कमी कमिशन उत्पन्न दाखवून उर्वरित रकमेचा अपहार करणे, पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे प्रत्यक्ष झालेल्या नफ्यापेक्षा मासिक अहवालात कमी नफा दाखवून उर्वरित रकमेचा अपहार करणे, इत्यादी बाबी तपासल्या असत्यात त्यामध्ये एकूण २७ लाख ८८ हजार ३९ रुपयांचा अपहार केला असल्याचे दिसून आले.
अशा प्रकारे तानाजी कोळी यांनी सौ. सुरेखा माळी व श्री. बाळासाहेब माळी यांचा विश्वास संपादन करून एकूण १ करोड ३२ लाख ५९ हजार १५६ रुपयांचा अपहार करून ते स्वतःच्या उपयोगासाठी वापरात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मॅनेजर तानाजी कोळी यांनी दि. १/११/२०२० ते दि. २८/२/२०२४ पर्यंत दत्तकृपा पेट्रोलियम येथे मॅनेजर म्हणून काम करत असताना वेळोवेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या रकमांचा अपहार करून सुमारे १ कोटी ३२ लाख ५९ हजार १५६ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सौ. सुरेखा माळी व श्री. बाळासाहेब माळी यांनी कायदेशीर तक्रार करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड यांना दिली आहे