महाराष्ट्र अंधारात जाणार? वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, उर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठकही रद्द

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय. मात्र यावेळी हे संकट केवळ शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे. कारण वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण काल (सोमवारी) सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली. पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची दाट चिन्हं आहेत. 

तिकडे बदलापुरात अनेक भागांमधला वीजपुरवठा तब्बल साडेपाच तास गायब होता. संप सुरु असल्यानं महावितरणला फोन केल्यानंतरही कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. तब्बल साडेपाच तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याची घटना घडली. एबीपी माझाने बातमी दाखवताच ज्या ज्या भागात वीज गायब झाली होती तिथली वीज पुन्हा आली आहे. त्याचं झालं असं की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात अनेक भागांत सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता. लाईट आता येईल, नंतर येईल अशी आशा नागरिकांना होती. मात्र रात्र होत आली तरी वीज काही येत नव्हती. बदलापूरकरांनी महावितरण कार्यालय आणि त्यांच्या अभियंत्यांशी संपर्क करुन वीज पुरवठा कधी सुरळीत होईल यासंदर्भातची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महावितरणकडून कोणताच प्रतिसाद बदलापूरकरांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक गृहिणींना अक्षरशः मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण बनवण्याची पाळी आली.

दरम्यान, खाजगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (28 मार्च) अनेक संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांसोबत महावितरण कर्मचारी देखील सामील झाले आहेत. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक भागांना त्याचा फटका सहन करावा लागला. 

*वीज कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?* 

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण त्वरित थांबवा

केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणाला विरोध

तिन्ही वीज कंपन्यांत 30 हजार कंत्राटी आणि बाहयस्त्रोत कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण प्रदान करा

महानिर्मिती कंपनी संचलित करीत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित थांबवा

तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे भरण्यास होत असलेल्या दिरंगाई विरुद्ध 

तिन्ही कंपन्यातील कर्मचारी अभियंते व अधिका-यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णया विरुद्ध 

चारही कंपन्यातील वरिष्ठ पदावरील अनावश्यक भरती, बदल्या यांतील राजकिय हस्तक्षेप या प्रश्नाकरिता व खाजगीकरण धोरणाविरुद्ध 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here