अनाथ व बेघर मुलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे काळजी गरज – आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
जन्मानंतरच आई – वडीलांचे छत्र हरपल्यानंतर अनाथ झालेल्या आणि राहण्याचा अथवा वास्तव्याचा कोणताही ठाव – ठिकाणा नसणाऱ्या बेघर मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे शासकीय पालकत्व स्वीकारून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळजी गरज निर्माण झाल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये बोलताना सांगितले आहे.
राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी तारांकीत प्रश्नमालिकेदरम्यान सदर मुद्द्यास हात घातला. अतिशय कमी वयात आवश्यक मार्गदर्शना अभावी ही अनाथ आणि बेघर मुले दिवसभर रस्त्यावर फिरून संध्याकाळी मिळेल त्या जागी रात्र काढतात. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने ही मुले बालमजुरी किंवा बाल गुन्हेगारीकडे वळून अल्पवयातच आपले जीवन उद्धवस्त करतात. अशा मुलांची वाढती संख्या आणि त्याप्रमाणात वाढणारे बालगुन्हे ही आपल्या
 राज्याच्या सशक्त महाराष्ट्र या संकल्पनेसाठी अतिशय धोक्याची घंटा असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
यावेळी प्रश्न उपस्थित करताना आ. समाधान आवताडे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांना उद्देशून विचारले की, दिवसभर रस्त्यावर राहून रात्री जवळच्या झोपडपट्टीत अथवा फूटपाथवर कुटुंबासमवेत राहणाऱ्या मुलांचे राज्य महिला व बालविकास विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येते का ? त्याचबरोबर सदर मुलांचे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येते का ? या मुलांच्या सर्वांगीण बालव्यक्तिमत्व विकासासाठी शासन स्तरावर कोणत्या उपाययोजना केल्या त्याबाबत स्पष्टीकरण करावे.
वरील प्रश्नांचे स्पष्टीकरण देताना महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे या मुलांच्या पुनर्वसनासाठीच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करणेबाबत जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा सर्व्हे सुरु आहे. सर्व्हे करताना आढळून आलेल्या अशा बालकांची चौकशी करून सर्वप्रथम त्यांचे पालक किंवा नातेवाईक यांचेकडे त्यांना सोडण्याचा प्रयत्न केला जातो.
तसेच बालकांना बालसंगोपन योजनेचाही लाभ देण्यात येतो. अशा बालकांच्या आई – वडील व नातेवाईक यांचा शोध नाही लागला तर अशा बालकांना बाल कल्याण समितीच्या समोर आणून बालगृहात सोडले जाते. आजची तरुण पिढी हे आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे अशा बालकांचा शोध घेऊन त्यांच्या भविष्य जडणघडणीच्या दिशेने योग्य ती कार्यवाही करून या बालकांच्या स्व- व्यक्तिमत्व विकासासाठी वाव देणे खूप गरजेचे आहे असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
अनाथ आणि बेघर बालकांच्या विकासासाठी संवेदनशील दृष्टिकोनातून आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न या संदर्भात मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी सदर मुलांच्या सर्वेक्षण मोहिमेस गती देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
चौकट – राज्याचे आणि देशाचे भविष्य असणाऱ्या या मुलांच्या समर्पक आणि विधायक प्रगतीसाठी आवश्यक ती धोरणे राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे – आ. समाधान आवताडे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here