राज्य सरकार व महावितरणने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये – आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या आदेशाने महावितरण कंपनीने तुघलकी आणि सुलतानी कार्यप्रणालीचा अवलंब करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली आहे.  महावितरणच्या अशा कार्य धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि महावितरण यांनी लवचिक भूमिका घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमचा उद्रेक पहावयास मिळेल असा घणाघाती इशारा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिला आहे.
थकीत वीजबिलाच्या नावाखाली महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ वसुली करण्याच्या हिटलरशाही उद्देशाने डी. पी. बंद करणे, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे सारख्या पद्धतीने शेतकऱ्यांना मानसिक आणि अर्थिक त्रास देण्याची मालिका सुरु ठेवली आहे. यामुळे अनेक शेतकरी सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. गेली अनेक वर्षे कोरोनाच्या खाईत लोटलेल्या विविध घटकापैकी शेतकरी सुद्धा अर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे.
महावितरण कंपनीच्या अशा अन्यायकारक धोरणामुळे पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील कै. सुरज जाधव या युवकाने विषप्राशन करून आपला जीव गमावला आहे. तसेच नेपतवाडी येथील एका शेतकऱ्यानेही डी. पी. पोलवर चढून आपला जीव देण्याची तयारी केली होती. शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणाऱ्या अशा धोरणांना महावितरण कंपनीने तात्काळ लगाम घालावा असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या राज्य सरकारच्या धोरणांचा आणि महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने चालू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात आवाज उठवून  दोन वेळेस सभागृह बंद पाडून सदर प्रश्नावर आवाज उठवला तरीही या असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा दिसत नाही.
महावितरण कंपनीच्या या वीज तोडणी कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या हाता – तोंडाला आलेला घास हिरावला जात आहे. सदर कंपनीचा असाच मनमानी कारभार सुरु राहिला तर शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना दाखवून देतील. शेतकऱ्यांच्या या लढाईत आपण शेतकऱ्यांच्या खांद्याला – खांदा लावून सहभागी होणार असल्याचा इशाराही आ. समाधान आवताडे यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना आधार द्यायचा सोडून त्यांची अशी पिळवणूक करणे म्हणजे कृषीप्रधान देश अशी ओळख असणाऱ्या शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव असल्याची तोफ आ. समाधान आवताडे यांनी डागली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here