जिल्ह्यातील नागरिकांचे प्रबोधन करून 100% लसीकरण  करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत-पालकमंत्री दत्तात्रय भरणे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  • जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवणे अथवा बंद बाबत प्रशासनाने सोमवार पर्यंत निर्णय घ्यावा
  • सांगोला, पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा या तालुक्यातील लसीकरणाची गती वाढवावी
  • माहे डिसेंबर 2021 मध्ये 10 लाख लोकांचे लसीकरण
  • राज्यात सोलापूर जिल्हा लसीकरणात 24 वरून 16 व्या क्रमांकावर

 

सोलापूर, दि.7 (जिमाका) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आपल्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अजून प्रसार झालेला नाही. या विषाणूचा आपल्या जिल्ह्यात प्रसार होऊ नये व जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून लस घ्यावी.  तसेच जिल्ह्याचे 100% लसीकरण झाल्यास कोरोनाचा प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करून संपूर्ण जिल्हा लसीकरणयुक्त करावा असे आवाहन मृद व जलसंधारण, वने, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

       जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा कोविड आढावा बैठकीत पालकमंत्री श्री भरणे मार्गदर्शन करत होते.  यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार यादव, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. पिंपळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. लोहारे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री. भरणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आपल्या जिल्ह्यात नगण्य राहील. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून लसीकरण मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवणे अथवा बंद ठेवण्याबाबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 10 जानेवारी 2022 पर्यंत यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.

        सोलापूर जिल्ह्याचे सरासरी लसीकरणाचे प्रमाण 83 टक्के पर्यंत गेलेले आहे. परंतु सांगोला, माळशिरस, पंढरपूर व  मंगळवेढा तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण अजूनही कमी दिसत आहे. तरी या चार तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित करून या भागातील 100% लसीकरण करण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने करावी, असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिले. तसेच दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून एक ही पात्र लाभार्थी यातून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.

       जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने माहे डिसेंबर 2021 मध्ये 10 लाख लोकांचे लसीकरण केल्याचे सांगितले. तसेच सोलापूर जिल्हा राज्यात 24 व्या क्रमांकावरून 16 व्या क्रमांकावर आलेला आहे असेही त्यांनी नमूद केले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक लसीकरणा स्वतःहून पुढे येत आहेत.  परंतु अजूनही सुमारे साडेचार लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. तरी उर्वरित नागरिकांनी स्वतःहून लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

         जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. पिंपळे यांनी जिल्ह्यात आजच्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या एकूण 48 असून त्यातील 24  बाधितरुग्ण ग्रामीण भागात तर 24 बाधित सोलापूर महानगर पालिका हद्दीतील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 195 इतकी असून त्यात ग्रामीण भागातील 122 तर मनपा हद्दीतील 73 रुग्ण आहेत असे ही त्यांनी सांगितले. 

     अठरा वर्षाच्या पुढील 34 लाख 14 हजार चारशे नागरिकांपैकी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 28 लाख 49 हजार 920 इतकी असून यातील 22 लाख 33 हजार 838 ग्रामीण भागातील तर सहा लाख 16 हजार 82 शहरी भागातील आहेत तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 17 लाख 2 हजार 166 इतकी असून त्यातील 13 लाख 2 हजार 158 ग्रामीण भागातील तर तीन लाख 99 हजार 308 शहरी भागातील असल्याची माहिती डॉक्टर पिंपळे यांनी दिली. तसेच 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील दोन लाख 26 हजार 412 मुलांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यातील आज पर्यंत 12 हजार 652 मुलांचे लसीकरण झालेले आहे असेही त्यांनी सांगितले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here