दिपावलीनिमित्त नागरिकांनी गर्दी करू नये – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर (दि.2):-  यावर्षी दीपावली उत्सव 2 ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजुनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करू नये, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, उत्सव साजरा करताना नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये  सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द  वगळून) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने यावर्षी दिपावली उत्सव साजरा करणेकामी खालीलप्रमाणे सूचना/आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली  उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. दिपावली उत्सवा दरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते, तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनांचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणांची पातळी वाढुन जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरित परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसुन येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्याच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालु वर्षी  फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीर उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती  करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येउ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

कोविड-19 च्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860 ) कलम 188 मधील तरतूदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here