सहकाराची सात तत्वे पाळावी.स्वार्थासाठी धडपड तपासून पहावी – . प्रा. संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकाराची सात तत्वे पाळावी.स्वार्थासाठी धडपड तपासून पहावी. प्रा. संग्राम चव्हाण

 

सहकारी चळवळीचा महाराष्ट्राला देशातील एक अग्रेसर राज्य बनवण्यामध्ये मोठा वाटा आहे.’विना सहकार नही उद्धार’हे सहकाराचे घोषवाक्य असून व्यक्ती व्यक्ती मध्ये सहकार्य वाढीस लावून व्यक्तिविकास साधने हे सहकाराचे ध्येय असावे. परंतु सहकारातील गलिच्छ राजकारणामुळे हे मूळ तत्व पायदळी तुडवले गेल्याचे दिसते. सहकार म्हणजे समान उद्दिष्टासाठी सामूहिक एकत्रित प्रयत्न.पण दुर्दैवानं सहकारामधे सामूहिक एकत्रित प्रयत्न ही भावना लोप पावलेली दिसते. त्यामुळे सहकारामध्ये निवडणूक पद्धत विकसित झाली. सर्व सभासदांनी बहुमताने पाच वर्षांसाठी संचालक म्हणून आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांच्या- मार्फत सभासदांनी दिलेल्या सूचनेनुसार संस्थेचा कारभार चालतो.
सहकारामध्ये विरोधी पक्ष हा रोगट मनोवृत्तीचा असणे हे संस्थेच्या दृष्टीने घातक असते. सहकारामध्ये प्रत्येक निर्णय हा सभासदांनी एकत्रपणे घेतलेला असल्यामुळे कोणत्याही निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या नफा-तोटा- नुकसानीच्या परिस्थिती ला सर्वस्वी जबाबदार सभासदच असतात कारण प्रत्येक सभासद हा संस्थेचा मालक असतो. सहकारामध्ये ‘ना नफा ना तोटा’हे तत्त्व पाळले जाते. नफ्या पेक्षा शेतकरी कामगार व दुर्बल घटक यांचे कल्याण व संस्थेचा विकास महत्त्वाचा असते. समान उद्दिष्टा साठी सामूहिक प्रयत्न म्हणजे सहकार. सहकारामध्ये सामूहिक एकत्रित प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरतात. सहकाराची पुढील सात तत्वे कटाक्षाने पाळली गेली पाहिजेत.
1.खुले व ऐच्छिक. सभासदत्व
2.लोकशाही नियंत्रण
3. सभासदांचा आर्थिक सहभाग
4. स्वायत्तता व स्वतंत्रता
5. शिक्षण प्रशिक्षण व माहिती
6. स्थानिक राज्यीय व राष्ट्रीय एकजुटीने काम
7. सामाजिक बांधिलकी
यातील 1ले तत्व म्हणजे खुले सभासदत्व. कोणताही नागरिक संस्थेचा सभासद होऊ शकतो.
या मधील 3 रे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सभासदांचा आर्थिक सहभाग होय. सभासद वाढवण्या मागे संस्थेच्या विकासासाठी लागणारे भागभांडवल वाढवणे हा एकमेव उद्देश असला पाहिजे. परंतु राजकीय हेतूने सभासद वाढवत असताना विरोधी गट हरकती घेतो परिणामी भागभांडवल निर्माण न होऊ शकल्यामुळे संस्थेचा विकास खुंटतो.
वरीलपैकी 5व्या क्रमांकाचे तत्व म्हणजे शिक्षण प्रशिक्षण व माहिती हे होय सभासदांनी सहकार कायद्याचा अभ्यास केला पाहिजे,सहकारी चळवळ समजून घेतली पाहिजे, गट-तट राजकारण सत्तास्पर्धा या गोष्टींना भीक न घालता सभासदांनी संस्था सक्षम, सुशिक्षित,निस्वार्थी व्यक्तींच्या स्वाधीन करून संस्थेचे कामकाज करून घेतले पाहिजे.
वरीलपैकी 6व्या क्रमांकाच्या तत्त्वानुसार सभासदांमध्ये स्थानिक राजकीय व राष्ट्रीय पातळीवर एकजूट दिसत नाही.उलट विरोधासाठी विरोध हे सर्रास चित्र आपणास पहावयास मिळते. बचाव समिती राज्याकडून मिळणारी मदत रोखण्यासाठी सरसावलेल्या दिसतात हे चित्र खूप घाणेरडे आहे. परंतु स्वार्थी व वाईट हेतूने प्रेरित राजकीय “टुकार टोळ्यांना” सभासदांनी थारा देऊ नये. सहकारातील 7 वे तत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी. सहकारामध्ये नेतृत्व करण्यासाठी मग तो सत्ताधारी असो वा विरोधक प्रत्येक धडपडणार्‍या नेत्यांकडे सामाजिक बांधिलकी,सकारात्मक दृष्टिकोन,परिपूर्ण विचार,
प्रगल्भता,क्षमता आहे की नाही की त्यांची धडपड व्यक्तिगत केवळ आर्थिक स्वार्थासाठी आहे हे सभासदांनी तपासून पाहिले मगच अशा लोकांना थारा दिला पाहिजे. संस्थेच्या प्रगतीला आडकाठी आणणार्या या विकृत प्रवृत्तींना सभासदांनी वेळीच ओळखून रोखण्याचे प्रयत्न एकजुटीने सुरू केले पाहिजेत. तर आणि तरच सहकारी संस्थेची नैसर्गिक प्रगती, वाढ व विकास होताना दिसतो. गलिच्छ व घाणेरड्या नकारात्मक राजकारणात अडकलेली संस्था ही मोडकळीस येऊ शकते त्यामुळे सभासदांनी सारासार विचार करून अशा विघातक प्रवृत्तींना आखुड बुद्धीच्या संकुचित वृत्तीच्या मंडळींना वेळीच रोखून तांदळा तल्या खड्या प्रमाणे बाजूला काढावे तरच संस्था टिकेल व वाढेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here