एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

प्रकल्प अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे आवाहन

सोलापूर // प्रतिनिधी 

एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा होणार नाही. अनुसूचित जमाती/आदिम जमातीच्या विद्यार्थी प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 6वी, 7वी आणि 8वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या गुणपत्रिका 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अपलोड करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.

अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपेक्षा कमी हवे तरच पाल्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अनुसूचित/आदिम जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक/शिक्षक/मुख्याध्यापक यांनी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत http://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.

ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलमधील स्टूडंट आयडी (19अंकी) माहिती असणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना विद्यार्थ्याचा स्टूडंट आयडी व मोबाईल नंबर टाकून अर्जदार विद्यार्थ्याचा पासवर्ड तयार करुन घ्यावा. पासवर्ड आपण नमुद केलेल्या मोबाईलवर तत्काळ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

प्रत्यक्ष अर्ज भरताना विद्यार्थ्यास कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यावयाचा आहे हे अचूक नोंदवावे.

पालकांचा राहण्याचा पत्ता विचारात घेऊन विद्यार्थ्यास गुणानुक्रमे नजिकच्या एकलव्य निवासी स्कूलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्जदार विद्यार्थी आदिम जमातीमधील, दिव्यांग असल्यास तशी नोंद अर्जामध्ये करण्यात यावी.

विद्यार्थ्यास ज्या इयत्तेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्याचा मागील वर्षाच्या इयत्तेचे 900 पैकी प्राप्त गुण अर्जामध्ये भरण्यात यावेत. तसेच संबंधित इयत्तेचे गुणपत्रक अपलोड करावे.

अर्ज भरल्यानंतर एखादी माहिती दुरुस्त करावयाची असेल तर विद्यार्थ्याचा सरल क्रमांक व पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन करावा. त्यानंतर माहिती दुरुस्त करुन झाल्यावर अर्ज पुन्हा अपडेट करावा.

परिपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लॉगिन केल्यानंतर प्रिंट ऑप्शनमध्ये जाऊन अर्जाची प्रिंट घेता येईल.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्लॉट नं2-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर. दूरध्वनी क्रमांक-0217-2607600, ईमेल-posolapurdist@yahoo.com किंवा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. आंधळे (8369688911) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती आव्हाळे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here