लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगारांना न्याय देणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

निसर्गाची पर्वा न करता रात्रंदिवस ऊसतोड मजूर हा ऊसतोडणीसाठी काबाडकष्ट करतो. अंधारात पहाटे उठून ऊस तोडून साखर कारखान्यांना पोहोच करण्याचे काम करतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

धोत्री ता. दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित शेतकरी स्नेह मेळावा आणि गळित हंगाम सांगता समारंभ कार्यक्रमात श्री. मुंडे बोलत होते. यावेळी आमदार संजय शिंदे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, लोकनेते शुगरचे बाळराजे पाटील, संतोष पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक विशाल शिंदे, तुळजा भवानी शुगरचे सुनील चव्हाण आदींसह शेतकरी, ऊसतोड कामगार, मुकादम उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या खूप व्यथा आहेत. या व्यथा सोडविण्यासाठी कामगार विभागाकडे जाणारे हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे घेतले आहे. महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. प्रती टन 10 रूपये कामगारांनी महामंडळाकडे जमा केल्यास शासन 10 रूपये देणार आहे. यातून कामगारांचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे.

 महामंडळामार्फत साखर कारखान्यांच्या सहकार्याने शंभर टक्के ऊस तोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा लागू करण्यात येणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

गोकुळ शुगरने मराठवाड्यात असलेला अतिरिक्त ऊस आणून विक्रमी सात लाख 71 हजार मेट्रीक टन गाळप केले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना संकटात मदत करायला हवी. महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे. कोरोना संकटात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले. त्यांनी सांगितले की, विक्रमी गाळपासोबत वीज निर्मिती कारखान्याने केली आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम करीत आहे. कारखाना बंद झाल्यानंतर 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाचे 140 कोटी जमा केले. उर्वरित तीन कोटी 60 लाख लवकरच जमा करीत आहे.

यावेळी माजी मंत्री श्री. चव्हाण, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक कपिल शिंदे, व्यंकट मोरे यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी श्री. मुंडे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 2022-23 या वर्षासाठी ऊसतोडणीसाठी मुकादम, वाहनमालक यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार विशाल शिंदे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here