पालखी मार्ग, तळांवरील जलस्त्रोत उपलब्धतेबाबत तात्काळ कार्यवाही करावी;प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरात आषाढी वारी निमित्त पंढरपूरात येणाऱ्या पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी तळावर शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी तात्काळ जलस्त्रोतांची पाहणी करुन आरोग्य विभागामार्फत तपासणी करावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

आषाढी वारी पुर्व नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शंकुतला नडगिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, मिलींद पाटील, धनजंय जाधव, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, उप कार्यकारी अभियंता श्री.मुकडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, व्यापारी संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, महाराज मंडळी, ग्रामपंचायत प्रधिनिधी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, पालखी महामार्गाच्या कामांमुळे पालखी मार्गावरील पुर्वीच्या अनेक ठिकाणच्या जलस्त्रोतांमध्ये बदल झाला असून, नवीन जलस्त्रोतांची तात्काळ पाहणी करावी. त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करुन पाणी पिण्यास योग्य, अयोग्य याबाबत ठळक माहिती फलक लावावेत.तसेच नगरपालिकेने वारीच्या मुख्य कालावधीत दोन वेळेस पाणी सोडण्याचे नियोजन करावे. मैलायुक्त पाणी नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिका, पोलीस प्रशासन व भीमा पाटबंधारे विभागान व दिंडी प्रमुख यांनी सयुक्तपणे नदीपात्रावरील घाटांची पाहणी करुन पालखीसाठी जाण्याचे व येणाचे मार्ग निश्चित करावेत. प्रदक्षिणामार्गावरील रस्त्याच्यामध्ये अनाधिकृत फेरीवाले थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही श्री. गुरव यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कदम म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, या कालावधीत प्रदक्षिणा मार्गावर ज्या संस्थानाचे मठ आहेत त्या संस्थांनाचे प्रमुख, दिंडी प्रमुख यांची वाहने लावली असतात. यात्रा कालावधीत भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वाहनांबाबत स्वयंशिस्त पाळावी व आपले वाहने वाहनतळावरच पार्क करावीत. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल वारीपुर्वीच भरुन घ्यावा जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही श्री कदम यांनी दिल्या.

यावर्षी पालखीसोहळ्या सोबत मोठ्याप्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, पंढरपूरातील प्रवेशासाठी दिडींतील वाहनांचे पास लवकर मिळावेत, वारीकालावधीत मठात वारकरी भाविकांची संख्या जास्त असल्याने दोन वेळेस पिण्याचे पाणी सोडावे अशी मागणी यावेळी महाराज मंडळी, दिडी प्रमुखांनी यावेळी केली.

वारी कालावधीत छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसाय करता यावा यासाठी हॉकर्स झोनची निर्मिती करुन त्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here