खरिपामध्ये शेतकऱ्यांना मुबलक खते, बियाणे उपलब्ध करून द्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे त्वरित करून घ्यावीत. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुबलक बियाणे व खते उपलब्ध होतील याबाबत नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

            नियोजन भवन जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. बैठकीस आमदार बबनदादा शिंदे ,सुभाष देशमुख, संजय शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, खताचा पुरवठा या महत्वाच्या बाबींचे नियोजन करून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असतानाही कृषी विभागाने चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी जाणवल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी देखील योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी बियाणे व दर्जेदार खते खरीप हंगामापूर्वी उपलब्ध झाली पाहिजेत. कृषी विभागाने यंदा 343970 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केलेले आहे. खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, मूग, मका पिकांच्या बियाची मागणी आहे. सोयाबीन बियाणाची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे.

            रासायनिक खतांच्या बाबतीत 2.12 लाख मेट्रीक टन सरासरी वापर आहे. खरीप हंगामात 233270 मेट्रीक टनाचे आवंटन मिळाले आहे. परवापर्यंत 95305 मेट्रीक टन खतसाठा उपलब्ध झालेला आहे. युरिया, डीएपी खताची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

बोगस बियाणे, साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई

शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणाऱ्या विक्रेत्या दुकानदाराबरोबरच बियाणे कंपनीवरही कठोर कारवाई करावी. तसेच खतांचा आणि बियाणांचा साठा करणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.

            खरीप हंगामात 2099.69 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ठ होते. यापैकी आतापर्यंत 271.61 कोटींचे पीक कर्ज वाटप झाले आहे. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचनाही केल्या.

            शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवून योजनांचा लाभ मिळवून द्या. 28522 कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांच्या शेती पंपाला तत्काळ वीज जोडण्या द्याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मान्सून लवकर सुरू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे, खते तत्काळ मिळावीत, अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी केली.

            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या व राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कृषी योजना अंमलबजावणीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर फळबाग लागवडीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आल्याने पालकमंत्री श्री. भरणे यांनी कृषी विभागाचे कौतुक केले.

            जिल्ह्यात 43 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असून सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत करण्यात आलेल्या कर्ज वाटपाची माहिती जिल्हा उपनिबंधक श्री. भोळे यांनी दिली.

            यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थी सुनिता सुनिल बंडगर, नंदा दुर्योधन चव्हाण, अर्चना दौलाप्पा हिप्परगा, दत्तात्रय सिद्धाप्पा सवळी, येताळा विठ्ठल थोरात यांना दोन लाभ रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते देण्यात आला.

            जास्त उत्पादन घेणारे शेतकरी ब्रह्मदेव सरडे, सदाशिव चौगुले, रूक्मिणी ढवळे, बाळासाहेब झांबरे यांचाही सन्मान करण्यात आला. कृषी विभागाचे उत्कृष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

            शेतीविषयक माहिती देणाऱ्या तीन घडीपत्रिकेचे प्रकाशन श्री. भरणे यांच्य हस्ते करण्यात आले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here