satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर // प्रतिनिधी 

राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या व्यक्ती असून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे. पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसासिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी 100 शासकीय अनुदानावर गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येत असून अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रता निकष

अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 40 हजार रूपये तर शहरी भागात 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसीलदार यांनी निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी. कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

 जोडावयाची कागदपत्रे.

अर्जदाराचा स्वत:चा सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेला जातीचा दाखला, चालू आर्थिक वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, अर्जदारा ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी भाड्याने, कराराने, खरेदीने/स्वमालकीची असल्याबाबत भाडेचिठ्ठी, कराराची प्रत किंवा खरेदी खताची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.                

आर्थिक वर्ष सन 2021-22 मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे दि.20 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here