26 जानेवारी – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष लेख.  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रजासत्ताक दिन राजपथ संचलन …राष्ट्रभक्तीची उच्चतम अनुभूती            

भारतीय तिरंगा आपल्या दोन्ही बाजूस मोठ्या डौलाने फडकत असतो. आसमंतदेखील  क्षणभर या ध्वजलहरीने स्तब्ध होतो. नजरेच्या टप्प्यात जिकडे पहावे तिकडे तिरंगाच. डोळेसुध्दा हे दृश्य पाहुन दिपून जातात आणि तिरंग्यास सलामी देत आनंदात वाहतात. देशभक्तीपर गीत, संगीत अशा मंत्रमुग्ध वातावरणाने कान तृप्त होतात. ओठी आलेले शब्द देखील स्तब्ध होतात. श्वासाश्वासातून राष्ट्रप्रेमाचा ध्यास आपल्या हृदयाची स्पंदन होतात आणि मन तिरंग्या सोबत मोठ्या आनंदाने  हिंदोळा घेते.

            होय ! अगदी असेच होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील राजपथ येथील संचलनाच्यावेळी संचलन करणाऱ्या प्रत्येकाची अन्‌ ते पाहणाऱ्या करोडो भारतीयांची हीच अवस्था होते. राजपथावरील त्या संचलनातून राष्ट्रभक्तीची एक उच्चतम अनुभती मिळते.

           नवी दिल्ली येथील राजपथवर हे संचलन दरवर्षी केले जाते. भारतीय लष्कराची ताकद आणि भारतीय एकात्मतेचे यथार्थ दर्शन संपूर्ण जगाला या निमित्ताने घडविले जाते. अगदी जगभरातून पर्यटक या सोहळ्यासाठी येतात. तसेच दरवर्षी एखाद्या विदेशी पाहुण्याला विशेष निमंत्रित केले जाते. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीं विशेष आमंत्रित नाहीत.

            1955 पासून या प्रजासत्ताक दिवस परेडला सुरुवात झाली. भारतीय लष्कराचे आर्मी, नेव्ही व एअरफोर्सचे तसेच विविध रेजीमेंट्सचे जवान, पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), स्काऊट गार्ड, RSP, चे विद्यार्थी यांचे पथक संचलन करतात. तसेच मा. राष्ट्रपतींचे घोडस्वार सुरक्षा पथक, ऊंटस्वाराचे पथक देखील यात सहभागी असते.  राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट अमर जवान ज्योतीपर्यंत असलेल्या राजपथाच्या दोन्ही बाजुने प्रेक्षकांसाठी जागा असते. विविध राज्यातील  वैशिष्ट्य दर्शविणारे  चित्ररथ तसेच निर्भय मिसाईल, अश्विन रडार सिस्टिम देखील या संचलनात असतात.

           यावेळी वायुदलाच्या आकर्षक व चित्तथरारक कवायती होतात. मोटारसायकलस्वार जवान कसरती करतात.    21 तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत सादर केले जाते. सेनादलाची सर्वोच्च पदक देऊन वीरांचा, शहिदांच्या कुटुंबाचा सन्मानाही केला जातो. हेलीकॉप्टरव्दारे पुष्पवृष्टी होते. एकूणच संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या धुक्याने आच्छादलेले असते. 

      प्रजासत्ताकदिनी राजपथावर विविध चित्ररथ पथसंचलनात सहभागी होतात यात केंद्रीय मंत्रालयांसह विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी असतात. यावर्षी आपल्या राज्याचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ आहे.

    प्रजासत्ताक दिन परेड आपल्या राज्यातही होते. शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे याचे आयोजन केले जाते. अगदी दिल्लीच्या संचलनाच्या धर्तीवर येथील आयोजन असते. मा.राज्यपाल महोदयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होऊन संचलन सुरु होते. या संचलनात संरक्षण दल, पोलीस, होमगार्ड, विद्यार्थी यांच्यासह विविध विभागांची पथकं आणि चित्ररथ सहभागी असतात.  

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here