जून महिन्यातच निवडणुका घ्या! (सर्वोच्च न्यायालयाने दिले निवडणूक आयोगाला आदेश!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिथे भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

पावसाच्या जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता, कोकण वगळता राज्यात सर्वत्र जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य आहे. जुलैमध्ये मात्र, निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे दिसते.
पावसामुळे जूनमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, या राज्य निवडणूक आयोगाच्या दाव्याला गेल्या पाच वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीने खोटे ठरविले आहे. कोकणव्यतिरिक्त उर्वरित राज्यात जूनमध्ये पावसाचे सरासरी दिवस १५ पेक्षा कमी असल्याचे आकड्यांवरून दिसते. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येणार असला तरी जूनमध्ये त्याचे प्रमाण सरासरीइतकेच असेल, असा अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने खरेच इच्छाशक्ती दाखविल्यास राज्यात निवडणुका होऊ शकतात. जुलैत बहुतांश राज्यात पावसाचे प्रमाण २० ते २५ दिवस असल्याचे दिसते. त्यामुळे जुलैत निवडणुकांसाठी वातावरण योग्य नाही.
आकडेच बोलतात…
कृषी खात्याच्या सांख्यिकी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीच्या आधारे हा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार जूनमध्ये कोकणात गेल्या पाच वर्षांत २०१९ वगळता चारही वर्षांत सरासरी २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये कोकणात निवडणुका घेता येणे शक्य नाही.
उर्वरित राज्यात २०२० व २०२१ वगळता इतर तीन वर्षांत सरासरी पावसाचे दिवस हे ७ ते १५ इतके आहेत. तर २०२० व २०२१ मध्ये हे दिवस पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात १५ ते १८ इतके आहेत. त्यामुळे येथेही निवडणुका घेणे शक्य असल्याचे दिसते.
– जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याचे दिसते. कोकणात संपूर्ण महिना पाऊस पडत असतो. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांत हे प्रमाण सरासरी २० ते २५ दिवस इतके आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हा पाऊस १५ ते २२ दिवस इतका पडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी या महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही.
– ऑगस्ट महिन्यातही कोकणात पूर्ण महिनाभर पाऊस पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित भागात २०२० चा अपवाद वगळता पावसाचे प्रमाण ७ ते १५ दिवस आहे. हीच परिस्थिती साधारण सप्टेंबरमध्येही दिसून येते.
यापूर्वी निवडणुका इतक्या लांबल्याचे दिसत नाही. मात्र, जूनमध्ये निवडणुका झाल्याचे आठवत नाही. हवामानाच्या अंदाजावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. – जे. एस. सहारिया, माजी निवडणूक आयुक्त
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पहिल्या टप्प्याच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचे वितरण समान असेल. यंदा मान्सून सहा ते सात दिवस लवकर येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजात चित्र आणखी स्पष्ट होईल. – (डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान खाते)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here