स्वेरीमध्ये उद्योजक प्रेरणा व नवनिर्मिती पर कार्यशाळेचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर-भविष्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर, सोबस इनसाइट फोरम व ए.आय.सी.टी.इ. स्पाइसेस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वेरीज नेसंट प्रोग्रॅम’चे दि.१९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२२ या एक महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाचे आयोजन इनोव्हेटीव्ह माइंड क्लब च्या माध्यमातून करण्यात आले असून त्याचे नुकतेच  उदघाटन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 
      या एक महिन्याच्या कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना तयार केलेल्या छोट्या वस्तूंचे प्रदर्शन दि. २० सप्टेंबर रोजी भरवण्यात येणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग क्षेत्रामध्ये करिअर करून, त्यात परिश्रम आणि गुणवत्ता यांचा सुरेख संगम साधला तर रोजगार निर्मिती होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून ग्रामीण भागाचा विकास साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलात्मक गुणांना वाव देण्याच्या हेतूने ‘स्वेरी नेसंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी समूह तयार करून सदर विद्यार्थी समूहाला महाविद्यालयाकडून ५०० रुपये अनुदान देयक (विना परतावा) देण्यात येईल. या अनुदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने छोट्या वस्तू तयार करावयाच्या आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल त्या मिळालेल्या अनुदानातून खरेदी करावयाचा आहे. तयार केलेल्या वस्तू या पुन्हा बाजारपेठेत विकायच्या आहेत. या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना मार्केटिंग कौशल्य, व्यवहार ज्ञान तसेच समाजिक अनुभव मिळणार आहेत. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी व नवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आत्तापर्यंत महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केवळ बौद्धिक कसोटी व परिश्रमाच्या जोरावर मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नेसंट प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून केएलई विद्यापीठ, कर्नाटक येथील डॉ. नितीन कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्रा. कुलदीप पुकाळे, सोबसचे गिरीश संपथ यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.या प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्यासाठीची गोडी निर्माण होऊन भविष्य काळामध्ये स्वेरीतून काही यशस्वी उद्योजक घडतील, हे मात्र नक्की. प्रा.अविनाश मोटे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रवीण ढवळे यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here