सोप्पं नसणार आहे १ जून ही जन्मतारीख मिरवणे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांतील बहुतेकांच्या जन्माच्या आणि शिक्षणाच्या संघर्षाची कहाणी असणार आहे…बहुतेकांचे जन्म दुसऱ्याच कुठल्यातरी तारखेला धोकादायक परिस्थिती, घरात, कदाचित अप्रशिक्षित दाई किंवा एखाद्या वयस्क स्त्रीच्या मदतीने झाले असतील. त्यांना कदाचित योग्य आरोग्यसेवाही मिळाल्या नसतील आणि कदाचित सगळं लसीकरणही केले गेले नसेल.

पुढे जन्मतारीख माहीत नसल्याने कुणा बाईंनी अथवा गुरुजींनी ही तारीख शाळेच्या प्रवेशासाठी टाकली असेल. सणवार, एखादी घटना, युद्ध, आजाराची साथ या वेळी जन्म झाला असे सांगून जन्माचे वर्ष निश्चित करून मग “टाका की गुरुजी तुम्हीच तारीख लेकराची” असे म्हणणाऱ्या आई-बापांचे खरे तर खूप कौतुक. त्यांच्या शिक्षण निष्ठेमुळे कदाचित आजचे अनेक अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षित राजकारणी आणि एकूणच शिक्षित पिढी आणि त्यांच्या पुढील शिक्षित पिढ्या समाजात आहेत.

१ जून ला ‘सरकारी जन्मतारीख’, ‘गुरुजींची जन्मतारीख’, ‘जागतिक जन्मदिन’ असे म्हणून हिणावणाऱ्या लोकांना हे समजले पाहिजे की या १ जून च्या flexibility मुळेच आज समाज मोठया प्रमाणात शिक्षित आहे. आधार कार्ड, जन्माचे सर्टिफिकेट, जन्मदाखला नसल्यामुळे आजही भटक्या-विमुक्त आणि वंचित घटकातील लेकरांना शिक्षणापासून आणि मूलभूत सुविधांपासून दूर राहावे लागते हे विदारक सत्य आहे. कागदपत्रांवर माणसाचे अस्तित्व स्वीकारणाऱ्या अथवा नाकारणाऱ्या आजच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा १ जूनला जन्मतिथी देणारी आणि मान्य करणारी शिक्षण व्यवस्था खरे तर जास्त संवेदनशील आणि मानवी होती असेच म्हणावे लागेल.

आज ज्यांचा ज्यांचा जन्मदिवस आहे अथवा ‘जन्मतारीख’ आहे त्या सर्वांना खूप खूप सदिच्छा आणि खरे तर तुम्हां सर्वांचे आभार.

कटू पण सत्य

पुरोगामी संघर्ष परिषद
माननीय कृष्णाजी गायकवाड
वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here