सात मोटरसायकलींसह 1790 लिटर हातभट्टी दारू जप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेशान्वये सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात   आली होती. त्यानुषंगाने अवैध मद्याच्या विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 14 एप्रिल रोजी पहाटे केलेल्या कारवाईत हातभट्टीची वाहतूक करणा-या सात मोटरसायकलींसह 1 हजार सातशे 90 लिटर हातभट्टी दारू जप्त करून तीन लाख 36 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक अ विभाग, निरीक्षक ब विभाग व भरारी पथक कार्यालयाने अवैध हातभट्टी दारू वाहतुकी विरोधात संयुक्त मोहीम राबवून 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे सापळे रचून 7 मोटरसायकलींवरुन हातभट्टी दारूची वाहतूक करताना 6 आरोपींना अटक केली आहे.  अटक केलेल्या आरोपींची नावे शंकर सत्यप्पा वाडी, रमेश केशव राठोड, विकास काशिनाथ पवार, चेनू वसंत चव्हाण, ज्योतिबा बद्धू राठोड व विजय थावरु पवार राहणार सर्व मुळेगाव तांडा व बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून एका फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदर कारवाईत सात मोटर सायकलींसह 1790 लिटर हातभट्टी दारु असा एकूण तीन लाख 36 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई निरीक्षक अ विभाग श्री एस एस फडतरे, निरीक्षक ब विभाग श्री एस एम मस्करे, दुय्यम निरीक्षक श्री एस ए पाटील, सौ यु. व्ही. मिसाळ, श्री ए. आर. आवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री होळकर, जवान लुंगसे, पांढरे, ढब्बे व इतर जवान स्टाफ यांच्या पथकाने पार पाडली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत अवैध दारू विरोधात एकूण 1630 गुन्हे नोंदविले असून त्यात 1534 वारस गुन्हे असून 1352 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे , सदर कालावधीत 40946 लिटर हातभट्टी दारु, 2600 लिटर देशी दारु, 766 लिटर विदेशी दारु, 365 लिटर बीअर, 10680 लिटर परराज्यातील दारु, 9056 लिटर ताडी, हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे 6 लाख लिटर रसायन तसेच 163 वाहनांसह एकूण 5 कोटी 56 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाकडून जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातून येणाऱ्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या मद्याविरोधातही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली असून 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून अंदाजे 1 कोटी रुपये किंमतीच्या दहा हजार लिटर परराज्यातील दारूसह 10 वाहने असा रुपये एक कोटी 30 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग श्री प्रसाद सुर्वे , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडून करण्यात आलेली आहे.

आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून येणाऱ्या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here