शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी विठ्ठल कारखान्याबाबत हात झटकले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी विठ्ठल कारखान्याबाबत हात झटकले

(पंढरपूर तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण)

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अर्थिक अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीतही कारखाना सुरु करण्यासंदर्भात कोणताच ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

विठ्ठल साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी काही संचालकांनीच ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेवून लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज (ता. १ ऑक्टोबर) पुणे येथे शरद पवारांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीची माहिती जाणून घेतली. बैठकीत राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी कर्जाचे पुनर्गठण करण्यास सहमती दर्शवली असली तर शेतकऱ्यांची थकीत एफआरपी व कारखाना चालू करण्यासाठी लागणारा निधी याविषयी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांची थकीत रक्कम कधी आणि कशी द्यायची, या विषयावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचेही बैठकीला उपस्थित असलेल्या एका संचालकाकडून सांगण्यात आले, त्यामुळे कारखाना सुरु होणार की नाही, या विषयीचा संभ्रम कायम राहिला आहे.

दरम्यान, कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत संचालक मंडळाची पुन्हा बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. कारखाना व्यवस्थापनाचे सर्व अधिकार दिले, तर मी एक महिन्याच्या आत कारखाना सुरु करुन दाखवतो, अशी भूमिका कारखान्याचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी बोलून दाखवली आहे. मात्र, त्यावरही ठोस निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे कारखाना भाडेतत्त्वार देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या बैठकीला कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक युवराज पाटील, विलास देठे, दिनकर पाटील, विजयसिंह देशमु आदींसह संचालक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here