विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या युवा महोत्सवामुळे मिळाले:विश्वराज‌(भैय्या) महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा 18 वा युवा महोत्सव शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा येथे आयोजित केला आहे.

यामध्ये अनेक कलाप्रकार आहेत.या विविध कला प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विविध कौशल्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या युवा महोत्सवामुळे होत असते यातूनच नवनवीन कलाकार घडून समाजाचे प्रबोधन करत असतात.याचा तरुणाईला नक्कीच फायदा होतो असे प्रतिपादन कोल्हापूरचे युवा नेता विश्वराज धनंजय महाडिक यांनी केले.

 

मंगळवेढा येथील दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या आठराव्या युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे अध्यक्ष अॅड.सुजित कदम,उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम,संचालिका मीनाक्षी कदम,सचिवा प्रियदर्शनी महाडिक,संचालिका तेजस्विनी कदम,श्रीधर भोसले,यतिराज वाकळे,युवा नेते विनोद महाडिक,मंगल महाडिक,सुवर्णा महाडिक, विजय महाडिक,पवन महाडिक,सोलापूरचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर,माजी शिक्षणाधिकारी शिवशरण,नाट्यपरिषद महानगर शाखा सोलापूरचे अध्यक्ष प्राध्यापक अजय दासरे,संजय सावंत, डॉ.रजनी दळवी,शिवतेज कदम आदी उपस्थित होते.

युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंचावर शास्त्रीय नृत्याने झाली. सोमवारच्या प्रसन्न सकाळी शास्त्रीय नृत्य पाहण्यासाठी युवा महोत्सवातील स्पर्धकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूर भाजपाचे युवा नेते विश्वराज धनंजय महाडिक यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करून शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पारंपारिक संगीताच्या तालावर शास्त्रीय नृत्याचे बहारदार सादरीकरण करून युवक युतीने युवा महोत्सवातील रसिकांना घायाळ करून सोडले.खूपच उत्साह आणि जल्लोषात या स्पर्धा पार पडल्या. रसिक प्रेक्षकांचाही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद राहिला.सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आधी विभागातील विद्यार्थिनी विनाश्री निम्बर्गी हिने आपल्या सुंदर नृत्याचा नजराणा सादर करून रसिक प्रेक्षकाकडून वाहवा मिळवली. तिने भरतनाट्यमचा सुंदर नृत्याविष्कार घडविला. त्यानंतर दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले. संगमेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी उर्मी कुलकर्णी हिने अतिशय तालबद्ध रित्या कथक नृत्याचा नृत्याविष्कार घडवीत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

दयानंद महाविद्यालय सोलापूर ,केबीपी पंढरपूर, शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज, वालचंद महाविद्यालय,शिवाजी महाविद्यालय बार्शी, वालचंद अभियांत्रिकी या महाविद्यालयाच्या संघानेही उत्कृष्टरित्या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले. 13 महाविद्यालयाने यात सहभाग घेतला .भारतीय संस्कृतीत शास्त्रीय नृत्याला विशेष महत्त्व आहे युवा महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाच्या कलेची जोपासना होताना दिसून आली .पारंपारिक वाद्याने महोत्सव नगरी दुमदुमली होती .फोक आर्केस्ट्रा मध्ये बासरीचा सुमधुर स्वर…. टाळ्यांचा गजर….टाळ मृदुंगाचा गजर…. पिपाणीची ललकारी…. ढोल ताशांचा निनाद… हलगीचा कडकडाट अन डमरूच्या आवाजाने एकाच वेळेस सादर केलेल्या कलेने युवा महोत्सव नगरी दुमदुमली.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंचावर फोक आर्केस्ट्राच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय व संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तबला,पेटी, ढोल, ताशा, हलगी वाजवून उपस्थितना भारावून सोडले.तरुणांच्या अंगी किती प्रकारच्या कला असतात हेच या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी दाखवून दिले.त्यानंतर त्यांनी टाळ, मृदंग, तबला, पेटी, हलगी व बासरी चा वापर केला. विद्यार्थी व प्रेक्षकांनीही त्यांच्या या कलेला दाद दिली.

 

शिवाजी विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारची पारंपारिक लोकवाद्यावर कला सादर करीत युवा महोत्सवात आणखीन जोश निर्माण केला.ढोल,ताशा, डमरू, हलगी, तबला, पेटी, घुंगरू आधी सर्वच वाद्य वाजवीत त्यांनी अनोख्या कलेचे दर्शन घडवले. अलीकडच्या काळातच युवा महोत्सवात सहभागी करण्यात आलेल्या फोक आर्केस्ट्रा स्पर्धेला महाविद्यालयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

स्थळ चित्र स्पर्धेमध्ये माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिराची स्थळ चित्रासाठी निवड करण्यात आली. यामध्ये 34 महाविद्यालयाने सहभाग नोंदवून अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग चित्रे अगदी सहजपणे रेखाटली.युवा महोत्सवामध्ये वाद विवाद स्पर्धा,सुगम,गायन आदी स्पर्धा पार पडल्या.शास्त्रीय सुरवाद्य स्पर्धेमध्ये संतूर वादनाचा पाच महाविद्यालयाने,पेटी वादनात 10 महाविद्यालय तर बासरी साठी पाच महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवला.पथनाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक घटकावर प्रभाव टाकला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्पाक काझी यांनी तर आभार अजित शिंदे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here