विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे पिंपळनेर युनिटचे विक्रमी गाळप-आ.बबनराव शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2022-23 गाळप हंगामाची सांगता झाली असून या हंगामामध्ये कारखान्याने विक्रमी गाळप केले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं.1 पिंपळनेर या कारखान्याची 17 मार्च रोजी सांगता झालेली आहे.या हंगामात युनिट नं.1 कडे विक्रमी 18 लाख 41 हजार 420 मे.टन गाळप करून 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. साखर उतारा 11.33 टक्के मिळालेला आहे. तसेच युनिट नं.2 करकंब या कारखान्याची 6 मार्च रोजी सांगता झाली असून या कारखान्याकडे 5 लाख 28 हजार 285 मे.टन गाळप करून 5 लाख 22 हजार 745 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. साखर उतारा 11.37 टक्के मिळालेला आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 व 2 कडे गाळपास आलेल्या ऊसाचे 10 मार्च अखेर पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा केलेले असून यासाठी एकूण 552 कोटी 36 लाख अदा केलेले आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतुकदारांना 28 फेब्रुवारी अखेर तोडणी वाहतूक बील अदा केले असून त्यासाठी 145 कोटी 54 लाख अदा केलेले आहेत.

 

या हंगामात युनिट नं.1 कडील नवीन 300 केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वीत झाला असून सिरप व बी हेव्ही पासून इथेनॉल उत्पादन घेण्यात आले आहे. आजअखेर हंगामामध्ये 2 कोटी 35 लाख लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असून 1 कोटी लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष सन 2022-23 मध्ये आजअखेर 4 कोटी 70 लाख लिटर्स आर.एस. व 4 कोटी 28 लाख लिटर इथेनॉल उत्पादन झालेले आहे.

 

तसेच दि.01/04/2019 पासून त्रिपक्षीय करारानुसार कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देणेबाबत साखरसंघ,मुंबई यांनी कळविले नुसार कारखान्याचे कामगारांना माहे नोव्हेंबर,2022 पासून पगारामध्ये 12 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. वेतनवाढीचे करारानुसार माहे एप्रिल,2019 ते ऑक्टोबर,2022 या कालावधीतील 12 टक्के वेतनवाढीचा एकूण 31 महिन्यांचा पगार कामगारांना देय होता. सदर देय फरकाची एकूण 5 कोटी 86 लाख रक्कम एकरक्कमी कामगारांचे बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. यापूर्वी देखील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 15 टक्के वेतनवाढीचा फरक एकरक्कमी कामगारांना अदा केलेला आहे. आजअखेर कामगारांचे कोणतेही वेतन थकीत नाही. अशाप्रकारे एकरक्कमी 12 टक्के वेतनवाढीचा फरक अदा करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव कारखाना ठरला आहे. कारखान्याने आजअखेर केलेल्या प्रगतीमध्ये कारखान्याचे सर्व मा.संचालक मंडळ, सभासद, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर,मटेरियल पुरवठादार, सर्व हितचिंतक तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे असे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.

 

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रजे व इतर खातेप्रमुख उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here