वारकऱ्यांनो तयारीला लागा! संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान, पाहा वेळापत्रक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

– राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.

दरम्यान, वारी सोहळ्यातील पालखीच्या मुक्कामांची, विसाव्याची माहिती देहू देवस्थानकडून जाहीर करण्यात आली आहे. यंदाचे वर्ष हे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 338वे आहे. 10 जूनला प्रस्थान झाल्यानंतर दरमजल करत सोहळा 28 जूनला पंढरपूरात पोहोचणार आहे. एकूण 19 दिवसांचा हा प्रवास असेल. पालखी 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अशी माहिती, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली आहे.

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.

रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल.

बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरूवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार जून जुन बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जून निमगाव केतकी, गुरूवार 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जून सराटी, शनिवार 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल.

रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.

बुधवार दि.28 जून रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार 29 जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल

गुरूवार दि. 29 जून ते सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. 3 जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरूवात करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून 13 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here