राज्यात मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्यात मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय

 

अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असतानाच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून (८ जुलै) कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस क्षीण झाला आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस  असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठय़ांवर परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जूनच्या अखेरच्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या झालेला शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे चिंतेत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे.

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे ८ किंवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यानंतर ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस होणार असून, ११ जुलैला त्याचा जोर वाढणार आहे.देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे.

८ जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. परभणी, िहगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.

९ जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागांत विजांचा कडकडाट.

१० जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टी.

११ जुलै : १० जुलैप्रमाणे मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here