मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते पंढरीतील गुणवंतांचा सन्मान 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संतोष रोपळकर यांच्या जुळ्या मुली कु. रिद्धी व कु. सिद्धी या एकसारख्या दिसणाऱ्या बहिणींनी योगायोगाने S.S.C. बोर्ड परीक्षेत एकसारखेच ९८.६० % गुण प्राप्त करत पंढरपूर तालुक्यातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेला आहे. विशाल आर्वे मित्रमंडळ व पांडुरंग परिवाराच्यावतीने मा. आमदार, पांडुरंग सह. सा. कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते गुणवंत रोपळकर भगिनींचा यथोचित सन्मान करत अभिनंदन करण्यात आले.
              तसेच, अवघ्या ७ वर्षांचा असताना एका दुर्दैवी अपघातामध्ये आपल्या आई-वडिलांचे छत्र हरपलेला, पुर्णपणे निराधार झालेला, माणुसकीच्या नात्याने धोंडोपंत दादा संस्थानने आपल्या मठामध्ये आश्रय दिलेला ‘चि. मयुर विठ्ठल पवार’ हा कर्मवीर औदुंबररावजी प्रशाला या विद्यालयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने मयुरचा व लहानपणापासून त्याला योग्य दिशा दाखवणारे, वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक सन्माननीय ‘तुकाराम खंदाडे सर’ यांचादेखील मा. प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते यथोचित सन्मान करत अभिनंदन करण्यात आले.
              याप्रसंगी सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना मयुर पवारने लहानपणी स्व. मोठ्या मालकांनी केलेल्या सहकार्याच्या आठवणींना उजाळा दिला. तर मा. प्रशांत मालक यांनी यशस्वी विद्यार्थी, खंदाडे सर व या सत्कार समारंभाचे आयोजक विशाल आर्वे यांचे मुक्तकंठाने कौतुक करण्याबरोबरच, यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यात कसलीही शैक्षणिक अडचण आल्यास सर्वोतपरी सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी दिले.
              महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, समाजसेवक श्रीनिवास उपळकर, महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश देशपांडे सर यांनी केले, तर शेवटी उपस्थितांचे आभार रणजीत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारंग दिघे, अरविंद गुंड, दिनेश वायचळ, किशोर काकडे आदीजणांनी अथक परिश्रम घेतले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here