महाडिक साहेबांनी चुका पदरात घेऊन कार्यकर्त्यांना आपलंसं केलं!पुन्हा तोबा गर्दी! वेटिंगवरील निष्ठावंतांना संधी देणार?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नैसर्गिक तसेच विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत निर्माण केलेल्या कृत्रिम अडचणींमुळे भीमा कारखाना संकटात सापडला होता.
‘दिल्ली गाजवण्याचे स्वप्न’ उराशी बाळगून कोल्हापूरचे ‘अवघड ‘ राजकारण सांभाळत भीमाच्या अडचणी सोडवताना कार्यकर्त्यांची एवढी गर्दी असूनही पडत्या काळात श्री.धनंजय महाडिक एकटे पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्यातच काही निकटवर्तीय स्वकीयांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळून अप्रत्यक्ष विरोधाचाच सूर आळविला, तर भीमा आता बंद पडतोय अशी अभद्र शक्यता वर्तवून काहींनी आपापली पुढील राजकीय सोय बघण्यासाठी मनातल्या मनात नवीन राजकिय समीकरणे जोडावयास चालू करून तसे विरोधी नेत्यांशी ‘आंतून ‘ संधान साधण्यास सुरवात केली.विरोधकांनी चुकीचे व खोटे आरोप करून आपल्या सेनापतीला रक्तबंबाळ केलेले असताना व निकराची लढाई त्वेषाने लढायची वेळ असताना काही कार्यकर्त्यांनी आपल्या तलवारी म्यान केलेल्या दिसल्या. मुन्नासाहेबांनी वेळच दिला नाही वेळ द्यायला पाहिजे! साहेबांकडून कडून खूप अपेक्षा होत्या! पगार व बिले दिली पाहिजेत! लोकांनी मोठ्या आशेने कारखाना ताब्यात दिला होता!आम्हाला रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे!लोकांना तोंड देणे अवघड झाले आहे!आम्ही पुन्हा पुन्हा तोंडावर पडत आहोत! आम्हाला मोबाइल बंद करून बसायची वेळ आली आहे! गोडाउन मध्ये साखर पोती आहेत का नाही कुणास ठाऊक! स्वकीयांच्याच या व अशा अनेक संदिग्धता निर्माण करणार्या “घरच्या आहेरां” मुळे महाडिक साहेबांना प्रचंड मनोवेदना झाल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. काही महत्त्वाच्या कार्यकर्ता व नेतेमंडळींनी आपला स्वतःचा ऊस ऊस बिल अडकून बसेल म्हणून इतर कारखान्याला घातला याचे मला मनस्वी दुःख झाले असेही महाडिक यांनी बोलून दाखवले. कुणी पंचायत समितीच्या पराभवाचं तर कुणी जिल्हा परिषदेच्या पराभवाचं तर कुणी ग्रामपंचायतीच्या पराभवाचं खापर भीमा कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर फोडताना व नेतृत्वाला दोष देताना दिसत होतं! तर कुणी आंदोलन उपोषण करण्यात गुंतलेलं होतं! एरवी पाय ठेवायला जागा पुरत नाही एवढी गर्दी पडायची. मात्र पडत्या काळामध्ये जवळचे कार्यकर्ते सुद्धा कारखान्यावर फिरकत नव्हते. काही कार्यकर्ते तोंड फिरवून लांब निघून जात होते. महाडिक साहेब एकटे पडले होते अशी खंत महाडिक साहेबांनी बोलून दाखवली. जो संकट काळात धावून येतो तोच खरा प्रामाणिक कार्यकर्ता असतो.या पडत्या काळामध्ये सामान्य सभासद मात्र महाडिक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर दिसत होते. महाडिक साहेबांनी स्वतःची जमीन घाण टाकून यंदाचा गाळप हंगाम पूर्ण केला. सामान्य सभासदाने महाडिक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपला संपूर्ण ऊस ‘भीमा’ लाच दिला.काही सुशिक्षित कार्यकर्ते सुद्धा या पडत्या काळात महाडिक साहेबांची योग्य बाजू विविध पातळीवर निडरपणे,खंबीरपणे मांडताना दिसत होते. महाडिक साहेबांनी वेळ दिल्याशिवाय एक्सपान्शन व कॉजनरेशन पूर्ण झाले का? वेळ दिल्याशिवाय थकित ऊस बिलांचा व पगाराचा प्रश्न सुटला का? वेळ दिल्याशिवाय कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न निकाली निघाले का? महाडिक साहेबांनीही सर्वांच्या विश्वासाला पात्र राहत कारखान्याचे सर्व प्रश्न सोडवत भीमा कारखाना पुन्हा रूळावर आणला. 5 लाख टन गाळप करून दाखवले. महाडिक साहेबांचे आता ग्रहमान प्रबळ झालेले दिसते. जो प्रयत्न करतो परमेश्वर त्याच्याच पाठीशी उभा राहतो. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची सभासदांनी दखल घेतली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले!भीमा कारखाना पुन्हा गर्दीने फुलून गेला. जे सोडचिठ्ठी द्यायच्या तयारीत होते त्यांची पुन्हा गर्दी झाली! अशा कार्यकर्त्यांनाही महाडिक साहेबांनी पुन्हा स्वीकारलेले दिसते.त्यांच्या चुका मोठ्या मनाने पदरात घेतलेल्या दिसत आहेत. मात्र अशा आणीबाणीच्या ऐनवेळी शेपूट दोन पायामध्ये घालून पळून जाणाऱ्या पळपुट्या कार्यकर्त्यांना मुन्ना साहेबांनी कुठेही संधी देऊ नये असा संपूर्ण कार्यक्षेत्रात सूर उमटला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भीमा परिवारातील दहा वर्षापासून वेटिंग वर असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक,तरूण कार्यकर्त्यांना आता तरी संधी मिळणार का? की पुन्हा जुन्या मंडळींनाच तिसर्यांदा संधी दिली जाणार? त्याच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सर्व सभासद पुन्हा स्वीकारतील का? ती त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होईल? संचालक मंडळां मध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी ही सभासदांची इच्छा महाडिक साहेब पूर्ण करणार की नाही?खांदेपालट होणार का? नवीन चेहरे मतदान हे खेचण्या इतके आकर्षक असणार का?

चौकट-
विश्वराज महाडिक यांना चेअरमन करा

शहरी जीवनाचे आकर्षण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर भेटीगाठी घेऊन आपल्या ॲडव्हान्स्ड हायटेक व मन मिळावू कार्यशैलीने अल्पावधीतच लोकांची मने जिंकणारे युवा नेता चिरंजीव विश्वराज महाडिक यांच्यावर यंदाच चेअरमनपदाची जबाबदारी सोपवावी अशी संपूर्ण भीमा कार्यक्षेत्रात प्रतिक्रिया उमटलेली दिसते. विश्वराज यांनी गावोगावचे दौरे पूर्ण कडून युवा वर्गाला आकर्षित केले आहे. वडीलधाऱ्या मंडळींची मनंही या युवा नेत्याने जिंकलेली दिसतात. या नव्या दमाच्या युवा नेत्याकडे भीमा कारखान्याची सर्व सूत्रे जाणार का? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here