पुन्हा ‘त्याच’ अज्ञात महिला भक्ताकडून विठुरायाला दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण (यांच्या अगोदर दिले होते 1.80 कोटींचे दागिने)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू देऊ नये असं म्हणतात, मात्र सध्या द्यायचे थोडे आणि वाजवायचे जास्त अशी जगाची रीत सुरु असताना जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा पंढरपूरच्या विठुरायाला तब्बल दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. काही दिवसापूर्वी याच महिला भक्ताने देवाला जवळपास पावणे तीन किलो सोन्याचे आणि चांदीचे दागिने देवाच्या विवाहादिवशी अर्पण केले होते. आज पुन्हा त्याच महिला भक्ताने आपल्या साधकांच्या माध्यमातून दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केल्याने विठुरायाच्या खजिना समृद्ध झाला आहे.

एकाच भक्ताकडून दुसऱ्यांदा मंदिरास असे सव्वा कोटी रुपयांचे दान मिळत आहे. यापूर्वी जालन्याच्या याच महिला भाविकाने एक कोटी 80 लाख रुपयाचे दान दिले होते. आजच्या मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकाने सोन्याचे धोतर, सोन्याची कंठी आणि सोन्याचा चंदनाचा हार विठ्ठल चरणी अर्पण केला आहे.

आज मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने जालना येथील या महिला भाविकाने अर्पण केले आहे. हे दागिने आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यानंतर सदर दागिने देवाच्या चरणी अर्पण करून देवाला परिधान करण्यात आले.

याच महिला भाविकाने वसंत पंचमी दिवशी 1 कोटी 80 लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते. दोन्ही वेळेला आपले नाव गुप्त ठेवण्याची अट या भाविकांनी ठेवली होती. अगदी मंदिर समितीचा सत्कार देखील स्वीकारायला या महिला भाविक समोर आल्या नाहीत. जालना येथील दत्त मंदिरात या महिला संतांचे मोठे काम असून त्यांचे हजारो अनुयायी असल्याचे समजते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिराला नित्यपूजेतून एक कोटीचं उत्पन्न

2024 सालच्या दैनंदिन नित्यपूजेच्या बुकिंगमधून विठ्ठल मंदिराला 75 लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला 33 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. त्यासाठी भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचं बुकिंग करून विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी 11 हजार रूपयांची रक्कम भरणं आवश्यक असतं. त्यानुसार त्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळून दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here