पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत सांडपाण्यावर उभारणार चिंचेचे बन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र शासनामार्फत सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून नद्यांचे होणारे प्रदूषण थांबवणे व नद्या बारमाही वाहत्या राहतील आणि त्या अमृतवाहिनी बनतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना या उपक्रमात सामील करून घेण्यासाठी सध्या ‘नदी संवाद यात्रेची’ मोहीम चालू आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी तीरावरील पटवर्धन कुरोली या गावात ही नदी संवाद यात्रा मंगळवार तारीख 28 रोजी आली होती. त्यावेळी भीमा नदीचे समन्वयक सूर्यकांत बनकर यांनी ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाची माहिती देऊन त्यातील ग्रामस्थांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तेव्हा गावच्या सरपंच प्रियांका नाईकनवरे, माध्यमिक शिक्षक नामदेव देशमुख, ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे, ऍड.पांडुरंग नाईकनवरे यांनी गावाकडून कोणत्याही प्रकारे नदीचे प्रदूषण होणार नाही याची ग्वाही दिली. यासंदर्भात त्यांनी गावच्या सांडपाण्यावर आधारित चार एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या चिंचेच्या बनाची माहिती दिली.
पटवर्धन कुरोली हे पंढरपूर तालुक्यातील भीमा तीरावर बसलेले 951 कुटुंब संख्येचे गाव! यापैकी जवळपास साडेपाचशे कुटुंबे ही गावठाण मध्ये राहतात. या कुटुंबाचे सांडपाणी आज पर्यंत भीमा नदीला जाऊन मिळायचे. याच गावाला लागून आणि भीमा नदीच्या तीरावर ग्रामपंचायतीचे चार एकर क्षेत्र आहे. या चार एकर क्षेत्रावर कायम काट्याच्या चिलार बाभळी यायच्या. गावात भरणाऱ्या ग्रामदैवत यात्रेच्या वेळी या चिलार काढून परिसर स्वच्छ करणे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे यासाठी ग्रामपंचायतीचा दरवर्षी 25 ते 30 हजार रुपये खर्च करावा लागतो. त्यामुळे गावातीलच माध्यमिक शिक्षक नामदेव देशमुख यांनी या चार एकर क्षेत्रामध्ये सांड पाण्यावर आधारित वृक्ष लागवड केली तर नदीचे होणारे प्रदूषण ही थांबेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही वृक्ष लागवड फायदेशीर ही भूमिका वारंवार मांडली. विद्यमान सरपंच प्रियांका नाईकनवरे आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे यांनीही सांडपाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले. त्यातून त्यांनी शासनाच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या माध्यमातून गावातील सांडपाण्याचे तीन ठिकाणी व्यवस्थापन करण्याचा कृती आराखडा तयार केला आहे. या तीन ठिकाणी सांडपाण्याचे स्थिरीकरण करून निवडलेल्या पाण्यावर आधारित ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चार एकर क्षेत्रावर शासनाच्या रोजगार हमी योजनेतून दोनशे चिंचेची झाडे लावण्याची योजना तयार केली केली आहे. या योजनेमुळे गावाचे नदीला मिळणारे सांडपाणी इथून पुढे नदीत मिसळणार नाही. त्यामुळे नदीचे जलप्रदूषण रोखले जाणार आहे. शिवाय चार एकर क्षेत्रावर चिंचेच्या झाडाची लागवड केल्यामुळे त्या ठिकाणी उगवणारी चिलार थांबणार आहे आणि दरवर्षी त्याच्या स्वच्छतेसाठी होणारा ग्रामपंचायतीचा 25 ते 30 हजार रुपयेचा निधी वाचणार आहे. विशेष म्हणजे गावातील काही बायका नदीवर धुणे धुण्यासाठी जातात, काही शेतकरी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी आणि धुण्यासाठी नदीवर नेतात. त्यासाठीही ग्रामपंचायतिने उपाययोजना आखली असून खास धुणे धुण्यासाठी पाणवठे तयार केले जाणार असून याचेही सांडपाणी ‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात’ सोडले जाणार आहे. जनावरांसाठी ही वेगळी पाणपोई उभी केली जाणार आहे. लागवड करण्यात येणाऱ्या दोनशे चिंचेच्या झाडाच्या व्यवस्थापनासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मजुराची नेमणूक केली जाणार आहे. यामुळे झाडांची निगा राखणे व जोपासना करणे शक्य होणार आहे. गावाकडून सर्व प्रकारचे भीमा नदीचे जलप्रदूषण रोखले जाणार आहे. शिवाय चार-पाच वर्षांनी चिंचेच्या झाडापासून ग्रामपंचायतीला भरीव आणि ठोस असे उत्पन्न मिळणार आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात झालेल्या या वृक्ष लागवडीमुळे गावातील हवा शुद्ध राहून वातावरण ही आल्हादायक राहण्यास मदत होणार आहे. यामुळे चला जाणूया नदीला या उपक्रमामध्ये विठुरायाच्या पावन नगरीतील पटवर्धन कुरोली गावाचा हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरावा असाच आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here