पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांची माहिती

कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी यांची समिती असून, या समित्याकडून बोगस डॉक्टरांची शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

या मोहिमेत तालुक्यातील तुंगत गावामध्ये एस.टी. स्थानकाजवळ पत्र्याच्या खोलीत रॉय बिवास बिरेन, वय-38 वर्षे, रा.घाट पातली, ता.वनगाव, जि. चोवीस परगाना, पश्चिम बंगाल येथील बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला. समितीकडून दवाखान्याची तपासणी केली असता मिळालेल्या औषध व बिलानुसार तो ॲलोपॅथीचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी केली असता वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याबाबत सांगितले. संबधिताकडे शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्यामुळे मेडीकल प्रॅक्टीशन ॲक्ट 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डॉ.बोधले यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण नसल्याने बोगस डॉक्टरांकडून रुग्णांना हानिकारक औषधे दिली जातात. त्याने रुग्णांच्या जीवतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांना बोगस डॉक्टर कसा ओळखावा याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्टरकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते. याबाबत रुग्णांनी संबंधित डॉक्टरांच्या पदवीची माहिती घ्यावी त्याबाबत काही शंका आल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी असे, आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्गाबरोबरच, डेग्यू, चिकनगुनियासारख आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच बोगस वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्यांकडून रुग्णांच्या जीवातास धोका निर्माण होत आहे. तालुक्यातील सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या दर्शनी भागावर बोगस डॉक्टरांविषयी तक्रार कोणाकडे करावी, यासाठी संबधित अधिकाऱ्याचे नांव, पद व दूरध्वनी क्रमांकाचा फलक लावावा असे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here