दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्वरित लाभ मिळवून द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.14 (जिमाका): कोविड संसर्गामुळे जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. 40 बालके दोन्ही पालक गमावलेले आहेत, 32 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित बालकांना त्वरित लाभ मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित विभागाला केल्या. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्री.शंभरकर बोलत होते. बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी, महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, परीविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, एच.डी. राऊत यांच्यासह सदस्य आणि संरक्षण अधिकारी उपस्थित होते.    

                श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात वडिल किंवा आई आणि दोन्हा पालक गमावलेल्या बालकांची संख्या 1039 झाली आहे. सर्व बालकांना बाल संगोपन लाभासाठी बालकल्याण समितीची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये दोन्ही पालके गमावलेल्यांची संख्या 40 आहे. या बालकांपैकी 17 बालकांना पाच लाख मुदत ठेवचा लाभ दिला आहे. 609 बालकांना बालसंगोपनचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित बालकांनाही त्वरित लाभ देण्यासाठी शिफारस केली आहे.  

                बालकांच्या शिक्षणाची सोय शासकीय शाळेमध्ये होत आहे. खाजगी शाळेत प्रवेश घेतला तर फीसाठी अडवणूक होऊ नये. फी भरणे शक्य नसलेल्या 42 बालकांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. उर्वरित बालकांची माहिती संबंधित विभागाने तयार करून समितीपुढे ठेवावी, म्हणजे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना शैक्षणिक फीसाठी मदत देता येईल, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.  

                कोविडमुळे विधवा झालेल्या 2125 महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार पेंशन योजनामधून प्रशासनाने त्वरित लाभ मिळवून द्यावा. संरक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना संपूर्ण माहिती द्यावी. नायब तहसीलदार यांच्याशी भेटून बैठक घ्यावी, दलालांशिवाय सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याच्या सक्त सूचनाही श्री. शंभरकर यांनी केल्या. 

                श्री. मोकाशी यांनी सांगितले की, पालक गमावलेल्या बालकांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी किंवा वाद असतील तर यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत करेल. वारस प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्यासाठी न्यायालय प्रयत्नशील आहे.  

                जिल्ह्यात कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेले बालक आजअखेर 1039 असून यामध्ये 82 माता तर 917 पित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली 40 बालके आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती पीएम केअर पोर्टलवर भरून पोस्टात खाते उघडण्यात आले आहे. अनाथ बालकांना बालसंगोपनाचा लाभ देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 35 लाखांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी प्राप्त झाल्यास सर्वांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.  

नियमित समुपदेशन, आरोग्य तपासणी

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मदतीने अनाथ बालकांची नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येत आहे. शिवाय नियमितपणे समुपदेशन करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.  

रस्त्यावरील मुलांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ           

ज्यांना आई-वडील आहेत, मात्र रस्त्यावर राहतात, त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने याचा सर्व्हे केला असून 69 मुले रस्त्यावर आढळली आहेत. त्यांची माहिती बालस्वराज चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्यूएशन या पोर्टलवर भरण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here