दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी कृती आराखडा तयार करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी कृती आराखडा तयार करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

 

सोलापूर,दि.17: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासन योजना राबवित आहे. दिव्यांग व्यक्तींच्या योजनांबाबत दिरंगाई करू नका. दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी संबंधित यंत्रणेने कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या.

 दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यासाठी विशेष समिती राबविण्याबाबत आयोजित बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, कामगार कल्याण अधिकारी विनोद कुलकर्णी, डॉ. बी.टी. दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.व्ही. सोनलकर, शिक्षण विभागाचे ए.डी. देशमुख आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यात जनगणनेनुसार एक लाख 21 हजार दिव्यांगांची नोंद आहे. यापैकी 36 हजार तीन दिव्यांगांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यातील 17 हजार 519 जणांना प्रमाणपत्र वितरित झाले आहे. जास्तीत दिव्यांगांना लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय टीम तयार करा. जिल्हा रूग्णालयाबरोबर उपजिल्हा रूग्णालये, केंद्र शासनाची व मनपाची रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, ग्रामीण रूग्णालये याठिकाणी प्रमाणपत्रे देण्याची सोय करावी. मात्र कुशल वैद्यकीय तज्ज्ञ, तांत्रिक कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागेल. यासाठी तालुकानिहाय दिव्यागांची माहिती घेण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

            कोणत्या विषयाचे तज्ज्ञ कुठे उपलब्ध असतील, त्याप्रमाणे नियोजन करा. कागदपत्रे काय लागतील याची माहिती दिव्यांग व्यक्तींना द्या. कृती आराखडा तयार करून त्यानुसार विविध ठिकाणी शिबीर आयोजित करावे. दिव्यांग व्यक्तींना एसटीमधील सवलतीसाठी आता युडीआयडी कार्ड ग्राह्य धरण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी एसटीच्या प्रतिनिधींना केल्या.

            बीज भांडवल कर्ज योजना, दिव्यांगाच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी वेळेवर निधी खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 2020-21 मध्ये 14 दिव्यांग जोडप्यांना 50 हजार प्रमाणे सात लाख रूपय विवाह प्रोत्साहनसाठी दिले आहेत. 2021-22 मध्ये 10 जोडप्यांना पाच लाख रूपये दिले असल्याची माहिती श्रीमती पाटील यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here