दरोडय़ाच्या पैशांमधून खरेदी केली 44 लाखांची मालमत्ता, सोलापुरात दोन सराईतांना अटक; 70 लाखांचा ऐवज जप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जुळे सोलापुरातील पॉश एरियामध्ये घर भाडय़ाने घेऊन चोरीचा धंदा करणाऱया कर्नाटकातील दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून नऊ लाखांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने, पिस्तूल, कार, दुचाकी, मोबाईल, स्थावर मालमत्ता असा सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात शहरातील 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे घरफोडी केल्यानंतर मिळालेल्या पैशांतून त्यांनी शहर परिसरात स्थावर आणि जंगम अशी 44 लाखांची मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उमेश विठ्ठल खेत्री (सध्या रा. ताकमोगे मंगल कार्यालयाजवळ, मूळ रा. बरगुंडी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) व लव सुरेश सासवे (सध्या रा. ज्ञानेश्वरनगर, जुळे सोलापूर, मूळ रा. गांधीनगर झोपडपट्टी, आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उमेश खेत्री व लव सासवे हे दोघेजण भाडय़ाने राहतात. शहरात काही दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटना वाढल्या असून, गुन्हे शाखेसमोर चोरटय़ांनी आव्हान उभे केले आहे. या घरफोडीचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयावरून उमेश खेत्री व लव सुरेश सासवे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या चौकशीत दोघेजण गेल्या वर्षभरापासून घरफोडी व जबरी चोरी करीत असल्याचे उघडकीस आले. या चोरीच्या पैशांतून उमेश खेत्री याने शेती, प्लॉट, सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी, कार घेतल्याचे उघडकीस आले. प्रॉपर्टी पत्नी, भावजी, सासू, भाऊ व नातेवाईकांच्या नावाने त्याने खरेदी केली असून, जवळपास 44 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. खेत्रीविरुद्ध कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला शिक्षाही झाली आहे. दुसरा आरोपी लव सुरेश सासवे याच्याजवळून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 25 लाख 93 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींकडून 9 लाखांची रोकड, चोरीतील पिस्तूल, 137 ग्रॅम सोने, 583 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. शहरातील 10 गुन्हे उघडकीस आले असून, हे दोन सराईत गुन्हेगार ज्या उच्चभ्रू परिसरात भाडय़ाने राहत होते, त्या परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहायक निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, संजय क्षीरसागर, श्रीनाथ महाडिक, संदीप पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल संताजी रोकडे, संतोष मोरे, कॉन्स्टेबल नीलेश शिरूर, राजकुमार वाघमारे, भारत पाटील, अजिंक्य माने व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here