जिल्ह्यात 2792 प्रकरणात समझोता घडविण्यास यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्ह्यात 2792 प्रकरणात समझोता घडविण्यास यश

572 प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच निकाली

 

सोलापूर // प्रतिनिधी 

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत झाली. लोकअदालतीमध्ये 25 हजार 769 प्रलंबित प्रकरणे आणि 15 हजार 704 दाखलपूर्व प्रकरणे अशी 41 हजार 473 प्रकरणे तडजोडीसी ठेवण्यात आली. यामध्ये 2792 प्रकरणात तडजोड करून समझोता घडविण्यास न्यायालयाला यश प्राप्त झाले तर 572 दाखलपूर्व प्रकरणे आपापसात निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.आर. देशपांडे, सचिव शशिकांत मोकाशी यांनी दिली.

निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणातून 64 कोटी 97 लाख 6255 एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली. लोकन्यायालयाचे उद्घाटन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘एकमुठ्ठी आसमान’ गीताने झाले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज सलगर, महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश शशिकांत मोकाशी, जिल्हा सरकारी वकील पी.एम. रजपूत आदी उपस्थित होते.

लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातून 36 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, दरखास्त, कलम 138 चलनक्षम कायद्याची, कौटुंबिक वाद इत्यादीची न्यायप्रविष्ठ प्रकरणे, बँका, टेलिफोन कंपनी, विविध वित्तीय संस्था यांची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

ऑनलाईनचा वापर

लोकअदालतीमध्ये एक प्रकरण पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने मिटविण्यात आले. कंपनीने इमेलद्वारे दाखलपूर्व प्रकरण विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविले होते. सामा संस्थेच्या मदतीने ऑनलाईन समुपदेशन श्रीमती डी.व्ही. किणगी यांनी केले. पक्षकाराने ऑनलाईन तडजोड रक्कम भरल्यानंतर ऑनलाईन सही घेण्यात आली. प्रकरणात प्रत्यक्ष कोणताही पक्षकार न्यायालयासमोर न भेटता ऑनलाईन पद्धतीने सर्व बाबी पार पडल्याचे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण होते.

कोरोनामुळे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते, अशांसाठी व्हॉटसअप कॉलचा वापर करून 56 प्रकरणामध्ये तडजोड करण्यात आली. यामुळे पक्षकारांना घरबसल्या न्याय मिळाला.

स्पेशल ड्राईव्ह

लोकअदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस स्पेशल ड्राईव्ह प्रत्येक प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये तीन दिवसात 4622 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

लोकअदालतीमध्ये कामकाज केलेले न्यायीक अधिकारी

जिल्हा न्यायालय पॅनेलवर न्यायाधीश श्रीमती आर.एन.पांढरे, श्रीमती आर.व्ही. मोहिते, व्ही.ए. कारंडे, व्ही.आय.भंडारी, एन.एन. जोशी, बी.सी. मोरे, एम.आर. देवकते, श्रीमती एन.एम. बिरादार, श्रीमती एस.वाय.सूळ, व्ही.बी. चव्हाण, श्रीमती आर.एस. तापडिया, एम.व्ही. किरमे, श्रीमती ए.सी. पारशेट्टी, आर.ए. मिसाळ यांनी कामकाज पाहिले. जिल्हा न्यायाधीश व्ही.जी. मोहिते, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एम. कनकदंडे, दिवाणी न्यायाधीश एस.एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या अधीक्षक पल्लवी पैठणकर, सचिन वडतिले, एस.एस.शहापुरे, श्रीमती के.वाय. चव्हाण, बाजीराव जाधवर, ए.बी. शेख, श्रीमती एस.एच. दापुरे यांनी परिश्रम घेतले.

प्रलंबित प्रकरणे

एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे-25769

एकूण तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे-2792

प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम-52 कोटी,93 लाख, 91 हजार 568 रूपये.

दाखलपूर्व प्रकरणे

एकूण ठेवलेली दाखलपूर्व प्रकरणे-15704

एकूण तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे-572

प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम-12कोटी,3 लाख, 14 हजार 687 रूपये.

तडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे-39

ऑनलाईन आणि व्हॉटसअपच्या मदतीने तडजोड प्रकरणे-57

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here